होमपेज › Pune › ‘सूक्ष्म सिंचन’च्या अंमलबजावणीचे मोदींकडून कौतुक

‘सूक्ष्म सिंचन’च्या अंमलबजावणीचे मोदींकडून कौतुक

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, देशात ही योजना राबविण्यात राज्याने अग्रस्थान मिळविले आहे. त्याचे कौतुक केंद्राच्या बैठकीत करण्यात आले असून अन्य राज्यांनी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राच्या दौरा करण्याचे आदेश पंतप्रधानांनी 9 मे रोजी दिल्ली येथे झालेल्या आढावा बैठकीत दिले. त्यासाठी 200 अधिकार्‍यांचा ताफा प्रथम दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर लवकरच येणार असून नंतर अन्य राज्यांचे प्रतिनिधी येणार असल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले.

आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये राज्यात सुमारे 1 लाख 60 हजार क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली नव्याने आलेले आहे. पंतप्रधान सुक्ष्म सिंचन योजनेतून महाराष्ट्राला गतवर्षात 620 कोटी रुपयांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला. या वर्षात प्रथमच सूक्ष्म सिंचन योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ही ऑनलाईन नोंदणी ते अनुदान वितरण हे संगणकीय प्रणालीवर करण्यात यश आले आहे. शिवाय आधारलिंक बँक खात्यावर शेतकर्‍यांच्या थेट अनुदान जमा करण्यामुळे योजनेत अधिक पारदर्शकात आल्याची माहिती फलोत्पादन संचालक प्र.ना. पोकळे यांनी दिली.

याबाबत  ते म्हणाले की, राज्यात येणार्‍या केंद्राच्या अधिकार्‍यांच्या पथकाला पुण्यात योजना अंमलबजावणी कशा पध्दतीने करण्यात आली, याचे प्रात्यक्षिकाचा एक दिवसाचा कार्यक्रम राहणार आहे. त्यानंतर शेतकर्‍यांच्या शेतावर भेटी देऊन सूक्ष्म सिंचनाची माहिती दिली जाणार आहे. हा कार्यक्रम महिनाअखेर होण्याची अपेक्षा आहे. ऑनलाईन पध्दतीने शेतकर्‍यांचे 2 लाख 85 हजार शेतकर्‍यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. 

तेवढ्या शेतकर्‍यांनी ऑनलाईन बिले सादर केलेली आहेत. अधिकार्‍यांनी शेतावर जाऊन सूक्ष्म सिंचनाची स्थळ पाहणी केलेल्या शेतकर्‍यांची संख्या 2 लाख 40 हजार असून प्रत्यक्षात 2 लाख 1 हजार 432 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 482 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. 620 कोटींच्या कार्यक्रमातील 482 कोटींची वाटप झाले असून उर्वरित 118 कोटींचे अनुदान वाटप संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर मे महिनाअखेर करून केंद्राने दिलेली उद्दिष्टपूर्ती पूर्ण करण्यात येईल.