Wed, Jun 26, 2019 17:39होमपेज › Pune › ऊस दर नियंत्रण मंडळावर १३ सदस्यांच्या नियुक्त्या 

ऊस दर नियंत्रण मंडळावर १३ सदस्यांच्या नियुक्त्या 

Published On: Aug 30 2018 5:59PM | Last Updated: Aug 30 2018 5:59PMपुणे : प्रतिनिधी

ऊस दर नियंत्रण मंडळाची समिती गठीत करण्यात आली असून या मंडळावर सहकार व पणन विभागाने १३ सदस्यांची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये शेतकर्‍यांचे पाच प्रतिनिधी, सहकारी साखर कारखान्यांचे दोन, खासगी दोन आणि विशेषत निमंत्रित चार शेतकरी प्रतिनिधी असे मिळून एकूण १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि साखर आयुक्तांच्या सदस्य सचिवांच्या उपस्थितीत १५ सदस्यीय समितीचे कामकाज लवकरच सुरु होण्याची अपेक्षा आहे. 

ऊस दर नियंत्रण मंडळाच्या पहिल्या समितीची मुदत संपल्याने हंगाम २०१७-१८ मधील उसाच्या अंतिम दराची निश्‍चिती रखडल्याचे वृत्त ‘पुढारी’ने प्रसिध्द केलेले होते. १ ऑक्टोंबरपासून १०१८-१९ चा ऊस गाळप हंगाम सुरु होणार असताना गतवर्षीच्याच उसाचे अंतिम दर रखडल्यामुळे हा विषय चर्चेचा झाला होता. 

राज्यातील साखर कारखान्यांच्या ऊस दराचे विनियमन २०१३ आणि नियम २०१६ या कायद्यान्वये समिती गठन करण्याचे आदेश सहकार विभागाचे उपसचिव दि. शि. देसाई यांनी जारी केलेले आहेत. त्या समिती सदस्यांची नांवे पुढीलप्रमाणे. शेतकरी प्रतिनिधी : शिवानंद नागनाथ दरेकर, धोत्री, ता.दक्षिण सोलापूर (जि.सोलापूर), प्रल्हाद रामजी इंगोले, मालेगांव, ता. अर्धापुर (जि.नांदेड), पांडुरंग बळवंत थोरात, आमदाबाद,ता.शिरुर (जि.पुणे), विठ्ठल नामदेव पवार, केशवनगर-मुंढवा (पुणे), भानुदास सुरेश शिंदे, कानगांव-ता.दौंड (जि.पुणे). 

सहकारी साखर कारखाना प्रतिनिधी : श्रीराम शेटे, कादवा सहकारी, मातेरेवाडी, ता.दिंडोरी (जि.नाशिक), धर्मराज काडादी, सिध्देश्‍वर सहकारी, कुमठे,ता. उत्तर सोलापूर (जि.सोलापूर) खाजगी साखर कारखाना प्रतिनिधी : डॉ. तानाजी सावंत, चेअरमन, भैरवनाथ शुगर, मुगांव-ता.परांडा (जि.उस्माणाबाद), नितीन कृष्णकांत मुधोळकर, चेअरमन मानस अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड इंफ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड, (जि. नागपूर) या प्रमाणे सहकारी व खाजगी कारखान्यांच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार 4 शेतकरी प्रतिनिधींची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ती नांवे पुढीलप्रमाणे. : खासदार संजय पाटील, तासगांव (जि.सांगली), वैभव नाईकवडी (जि.सांगली), महामुद पटेल, कुरगुट दक्षिण सोलापूर, कृषिभूषण शेतकरी संजीव माने, आष्टा-ता.वाळवा (जि.सांगली) आदींचा समावेश आहे.

ऊस दर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांच्या नियुक्त्यांवर शासनाने शिक्कामोर्तब केलेले आहे. त्यानुसार पत्र पाठवून मुख्य सचिवांकडून बैठकीची तारीख घेतली जाईल. त्यांच्याकडून दिलेल्या तारखेनुसार नवीन समिती सदस्यांच्या पहिल्या बैठकीची विषयपत्रिका निश्‍चित करुन पुढील कामकाज पूर्ण केल जाईल.

- संभाजी कडू पाटील, साखर आयुक्त.