Wed, Aug 21, 2019 15:08होमपेज › Pune › विद्यार्थी सुरक्षेसाठी शासनाचे पाऊल  शारीरिक, मानसिक त्रास देऊ नका; शाळा-महाविद्यालयांना सूचना

सीसीटीव्ही बसवा; तीनवेळा हजेरी घ्या

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 1:05AMपुणे :अनिल देशमुख

शाळा - महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेतली जाणार आहे. त्याकरिता शाळा-महाविद्यालयांनी ठोस उपाययोजना करण्याबाबत राज्य शासनाने परिपत्रक काढले आहे. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरासह प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसवा तसेच विद्यार्थ्यांची सकाळ, दुपार आणि सायंकाळी जातानाही हजेरी घ्या आणि ती माहिती पालकांना एसएमएसद्वारे द्या, यासह शारीरिक अथवा मानसिक इजा होईल अशी शिक्षा करू नका, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी सुरक्षिततेबाबत अनेकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण होणारे प्रकार घडले आहेत. शाळेत होणार्‍या लैंगिक अत्याचार, मारहाण आदींच्या घटनांतही होणारी वाढ चिंताजनक आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने शाळा-महाविद्यालयांसाठी परिपत्रक काढून विविध सूचना केल्या आहेत.

शाळा - महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासह बाहेर जाणार्‍या प्रत्येक दरवाजावर पुरेशा प्रमाणात तसेच परिसरात सीसीटीव्ही बसवा, प्रवेशद्वार, बाहेर जाणार्‍या दरवाजावर सुरक्षा रक्षक नेमावा, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला शाळेच्या आवारात प्रवेश देऊ नका. विद्यार्थ्यांची सकाळ, दुपार आणि सायंकाळी अशा तीनवेळा हजेरी घ्या, त्याची माहिती दररोज एसएमएसद्वारे पालकांना कळवा. विद्यार्थी शाळेत अथवा शाळेच्या आवारात असताना, त्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळेवरच राहील, असेही या परित्रपकात स्पष्ट करण्यात आले आहे.

शाळा सुटल्यानंतर वर्गात, स्वच्छतागृहात अथवा परिसरात कोठेही कोणीही विद्यार्थी मागे राहिलेला नाही, याची काळजी आता शाळा-महाविद्यालयांना घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे शारीरिक अथवा मानसिक इजा होणार नाही अशी शिक्षा करू नये, असेही स्पष्ट केले आहे. आकस्मित प्रकरणी मुलांचे पालक अथवा नातेवाईक शाळेत येईपर्यंत मुलांना सोडू नये, पालकांच्या संमतीशिवाय ओळखपत्र तपासल्याखेरीज अन्य व्यक्तीकडे मुलांना सोपवू नये, तसेच शाळेतील शिक्षक, कर्मचारी आदींची नेमणूक करताना त्यांच्याकडून पोलिसांच्या चारित्र्य पडताळणीचा दाखला घ्यावा, अशी सूचनाही केली आहे.

शाळा - महाविद्यालयांत तक्रारपेटी बसवण्यात यावी. विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांची, त्यांच्या कर्मचार्‍यांची माहिती घ्यावी, विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने घरी सोडण्यात येते की नाही याबाबत लक्ष ठेवावे, अत्याचाराबाबत कायद्याची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत, तसेच अशा प्रकारात पोलिसांत तक्रार करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला सहकार्य करावे, अशा 22 सूचना करण्यात आल्या आहेत.