Fri, May 24, 2019 02:47होमपेज › Pune › ‘आरटीई’साठी १ फेब्रुवारीपासून अर्ज

‘आरटीई’साठी १ फेब्रुवारीपासून अर्ज

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 28 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी 

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणार्‍या 25 टक्के राखीव प्रवेशासाठी शाळांची नोंदणी करण्यासाठी 25 जानेवारीची मुदत देण्यात आली होती; परंतु ‘आरटीई’साठी पुण्यातील साधारण 850 शाळांनी नोंदणी करणे अपेक्षित असतानाही आतापर्यंत केवळ 734 शाळांनीच ‘आरटीई’ प्रवेशासाठी नोंदणी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे उर्वरित शाळांनीदेखील नोंदणी करावी. यासाठी येत्या 30 जानेवारीपर्यंत शाळांना मुदतवाढ देऊन 1 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती प्राथमिकचे उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.

यंदाच्या आरटीई वेळापत्रकानुसार ‘आरटीई’च्या संगणक प्रणालीमध्ये आपल्या शाळेतील एकूण जागा, त्याअंतर्गत राखीव जागा व प्रवेशाचा एन्ट्री पॉइंट कोणता या बाबींसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ‘आरटीई’चा कायदा ज्या ज्या शाळांना लागू आहे, अशा सर्व शाळांनी ही नोंदणी करणे अनिवार्य आहे. गेल्या वर्षी शहरातील 849 शाळांनी या प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला होता; त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या तब्बल 15 हजार 693 जागा उपलब्ध झाल्या होत्या; पंरतु यंदा अगोदर 20 जानेवारीनंतर 25 जानेवारी आणि आता 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्राथमिकचे उपसंचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्वच विभागांतील शिक्षणाधिकार्‍यांना दूरध्वनीवरून संपर्क करत सद्यःस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांना येत्या 30 जानेवारीपर्यंत ज्या शाळांनी नोंदणी केली नाही त्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मागील वर्षी 849 शाळांमधून 15 हजार 693 जागा राखीव प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या होत्या. सध्या 734 शाळांमधून 13 हजार 629 जागा उपलब्ध असल्याचे दिसत आहे.

तसेच येत्या 30 तारखेपर्यंत उर्वरित शाळांचीदेखील नोंदणी करण्यात येणार असून, आरटीई प्रवेशाच्या जागा आणखी वाढणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले. आरटीई प्रवेशाचा परतावा देण्यात येत असून, फक्त 2016-17 मधीलच काही शाळांचा परतावा देणे बाकी असल्याचेही गोसावी यांनी स्पष्ट केले. आरटीई प्रवेशासाठी जास्तीत जास्त शाळांची नोंदणी करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी पाठपुरावा केला आहे.