Tue, Oct 22, 2019 02:01होमपेज › Pune › पिंपरी महापालिकेची मराठी भाषेबाबत अनास्था

पिंपरी महापालिकेची मराठी भाषेबाबत अनास्था

Published On: Feb 27 2018 1:58AM | Last Updated: Feb 27 2018 12:58AMपिंपरी : पूनम पाटील

पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होत आहे. औद्योगिकनगरीबरोबरच सांस्कृतिकनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख होऊ पाहत आहे. परंतु मराठी  भाषासंवर्धनाबाबत शहरात विशेष प्रयत्न होत नसल्याने मराठी भाषेबाबत अनास्था असल्याची खंत शहरातील साहित्य क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. इतर वेळी विकासकामांचा धडाका लावणारी महापालिका भाषेच्या विकासाबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. मराठी भाषासंवर्धन समितीची स्थापना होऊन आज अनेक महिने लोटले, तरी स्थापनेपासून समितीची एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे महापालिकेचे मराठी भाषेचे प्रेम केवळ कागदोपत्रीच असल्याचे सिद्ध झाले आहे. 

27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस. ज्येष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांनी मराठी भाषेला कथा, कादंबरी, नाटक, ललित वाङ्मयाच्या रूपात दर्जेदार साहित्य दिले. म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. शहरातूनही  सुमाग्रजांसारखी दर्जेदार साहित्यनिर्मिती करणारे साहित्यिक निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती; परंतु गेल्या काही वर्षांत शहरातील साहित्यिक चळवळ काही अंशी थंडावली असून, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शहरातून विशेष प्रयत्न होत नसल्याची खंत मराठी भाषाप्रेमींनी व्यक्त केली आहे. 

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद व बोटावर मोजण्याइतक्या काही संस्था प्रयत्नशील आहेत; परंतु एक-दोन बोटावर मोजण्याइतक्या संस्था सोडल्यास मराठी भाषासंवर्धनासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. शहरात इतर कार्यक्रम धुमधडाक्यात साजरे करण्यात येतात; मात्र मराठी भाषेच्या संवर्धनासाठी का प्रयत्न होत नाहीत, असा सवाल मराठी भाषाप्रेमी करत आहेत. शहरातील शासकीय कार्यालयांतही मराठी भाषेबद्दल अनास्था असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 
पुणे महापालिकेने मराठी भाषासंवर्धन समिती स्थापन केली असून, या समितीच्या कामासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली होती; तसेच समितीच्या वारंवार बैठका घेऊन मराठी भाषेबाबत विशेष उपक्रम राबवण्यात आले होते.

त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मराठी भाषासंवर्धन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत शहरातील; तसेच साहित्यक्षेत्रातील नामांकित व्यक्तींची नेमणूक करण्यात आली; परंतु मराठी भाषेचे हे प्रेम केवळ कागदावरच असल्याचे दिसून आले. भाषा समितीच्या निर्मितीनंतर एकदाही समितीची बैठक घेण्यात आली नसल्याचे समितीतील सदस्यांनी सांगितले. 

मराठी भाषा समिती सत्तांतराच्या गर्तेत

राष्ट्रवादीच्या काळात स्थापन झालेल्या या समितीची वर्षभरात एकही बैठक झाली नाही. त्यानंतर सत्तांतरानंतरही मराठी भाषासंवर्धन समितीची एकदाही बैठक घेण्यात आली नाही. याउलट समितीच्या कामाबद्दल पाठपुरावा करत असतानाही भाषा समिती पुनर्रचित करावी, अशी मागणी होत आहे; परंतु मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पक्षीय भेद विसरून सर्वांनी एकत्रित येऊन भाषासंवर्धनासाठी प्रयत्न करावेत. पुण्याच्या धर्तीवर विविध उपक्रम राबवल्यास मराठी भाषेचा निश्‍चित विकास होईल. -धनंजय भिसे, सदस्य, मराठी भाषासंवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड

मराठी भाषा समितीने पुढाकार घ्यावा

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत; परंतु मराठी भाषा समितीने मराठी भाषेबाबत काही दखल घेतली नाही. मराठी भाषा समितीने पुढे काहीतरी प्रयत्न करायला हवे होते. पुण्यातील मराठी भाषा समिती मराठी भाषेसाठी वर्षभरात काही ना काही कार्यक्रम राबवत असते; परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेने याबाबतीत पुढाकार घेणे अपेक्षित होते. परंतु आजवर त्याबाबत पावले उचलण्यात आलेली नाहीत. याकामी समितीने कार्य करणे अपेक्षित होते. 

- राजन लाखे, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड