Sun, Jun 16, 2019 03:11होमपेज › Pune › #Women’sDay‘लेक वाचवा’चे कार्य हाती घेतलेल्या डॉ. अपर्णा 

#Women’sDay‘लेक वाचवा’चे कार्य हाती घेतलेल्या डॉ. अपर्णा 

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 1:20AMपिंपरी-चिंचवड येथील मोशी या ठिकाणी असलेल्या आदिशक्ती हॉस्पिटलमध्ये डॉ. अपर्णा शिंदे यांनी आपल्या पतीसमवेत काम करत असताना मुलगी झाल्यामुळे रडणारे अनेक आई-वडील पाहिले. यातूनच मुलींसाठी काहीतरी करण्याची इच्छा डॉ. अपर्णा यांच्यामध्ये निर्माण झाली आणि ‘लेक वाचवा’ हे जनआंदोलनाचे कार्य त्यांनी हाती घेतले. 

‘लेक वाचवा’ आंदोलनाचे काम करणारे डॉ. गणेश राख यांच्या प्रेरणेतून डॉ. अपर्णा यांनी ‘मुलगी वाचवा’ अभियानाचे बीज रोवले. डॉ. अपर्णा आणि डॉ. अजित शिंदे यांनी 2012 साली मोशी येथे आदिशक्ती हॉस्पिटल सुरू केले. हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून डॉ. अपर्णा  ‘लेक वाचवा’ अभियान चालवीत आहेत. या अभियानांतर्गत मुलीचा जन्म झाल्यास बिलामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येते; तसेच मुलींना सर्व प्रकारच्या लसीकरणामध्ये 25 टक्के सवलत देण्यात येते. ही योजना सुरू केल्यानंतर मुलगी झालेल्या आई-वडिलांना पुष्पगुच्छ देऊन मिठाई वाटून जन्मदिवस साजरा केला जातो. 

डॉ. अपर्णा यांचा जन्म नगर जिल्ह्यातील कोल्हार या छोट्या खेड्यात झाला. अपर्णा यांच्या घरात त्या दुसरी मुलगी म्हणून जन्माला आल्या तेव्हा आई-वडील सोडून सर्वांना दु:ख झाले होते. मुलगी झाली म्हणून आजही शोक करणारे नातेवाईक पाहायला मिळतात. हे चित्र बदलण्यासाठी आदिशक्ती रुग्णालयाने पुढाकार घेत मुलगी झाली की, त्या आई-वडिलांचा सत्कार केला जातो.  मुलीचा जन्म हा शोक करणारा नाही, तर प्रतिष्ठेचा आणि अभिमानाचा जन्म आहे हे डॉ. अपर्णा शिंदे यांना दाखवून द्यायचे आहे. ‘मुलगी वाचवा’ हे अभियान डॉ. अपर्णा यांच्या संकल्पनेतून साकारले आहे. त्यासाठी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय रुग्णसेवा पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. 

- वर्षा कांबळे