Tue, Apr 23, 2019 10:02होमपेज › Pune › ‘साहेब, वॉर्डनचा थाट कमी करा’

‘साहेब, वॉर्डनचा थाट कमी करा’

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 01 2018 10:50PMपिंपरी : प्रतिनिधी

परवाने तपासण्याचा कुठलाही अधिकार नसताना शहरातील ‘वॉर्डन’ वाहनचालकांची अडवणूक करतात. वाहतूक नियमनाचे मुख्य काम सोडून चिरीमिरीसाठी सावज शोधण्याकडेच त्यांचे जास्त लक्ष असते. वाहतूक पोलिसांच्या मूकसंमतीने ‘वॉर्डन’ वाहने अडवून चालकांशी हुज्जत घालत असल्याचे सर्रास पहावयास मिळते. वाहनचालकांशी बोलताना फौजदारापेक्षाही मोठा रुबाब वॉर्डनचा पहावयास असतो. त्यामुळे साहेब, यांचा थाट कमी करा... असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.  

शहराला वाहतूक कोंडीसारख्या असाध्य रोगाने ग्रासले आहे. शहरातील ‘शॉपिंग मॉल’ आणि ‘कॉम्प्लेक्स’, मोबाईल व कापड मार्केट, भाजी मंडई, सिनेमागृहे, हिंजवडी आयटीहब या परिसरात दररोज वाहतूक कोंडी होते. ही कोंडी रोखण्यासाठी वाहतूक विभातील अधिकार्‍यांनी विविध प्रयोग राबवून पहिले. परंतु त्याचा उल्लेख करण्यासारखा फायदा होऊ शकला नाही.

वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्याची ओरड होऊ लागल्याने त्यांच्या मदतीसाठी पालिकेकडून कंत्राटी पद्धतीने ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करण्यात आली.  वाहतूक पोलिसांना मदत करत गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. मात्र, अलीकडे वॉर्डन मुख्य कामापासून भरकटल्याचे दिसून येत आहेत. वाहतूक नियमनाच्या मदतीसाठी उभे करण्यात आलेले वॉर्डन आता थेट वाहने अडवून अरेरावी करू लागले आहेत. कळस म्हणजे वाहतूक पोलिसांच्या गैरहजरीमध्ये थेट चालकांकडे कागदपत्रांची तपासणी केली जाते. कित्येकदाकोंडी होत असताना वॉर्डन दुचाकीस्वारांशी हुज्जत घालतात. वाहतूक पोलिसांसमोर देखील वॉर्डन चालकांशी वाद घालत असतात. यावेळी पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांच्यात काहीतरी साठलोटं असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

‘पोलिसी स्टाईल’मुळे घाबरगुंडी

अनेक वाहनचालकांना वॉर्डनच्या कामाची काहीच माहिती नसते. पोलिसांसोबत काम करत असल्याने त्यांच्यासारखे बोलण्याची लकब वॉर्डनने शिकली आहे. त्यांच्या बोलण्याच्या पोलिसी स्टाईलमुळे अनेकजणांची घाबरगुंडी होते. त्यामुळे बर्‍याचदा वाहनचालक वॉर्डनला पोलिस समजून तडजोड करीत स्वतःची सुटका करून घेतात.