Sun, Jul 21, 2019 15:02
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › डीएसकेंची मेहुणी अनुराधा पुरंदरे अटकेत

डीएसकेंची मेहुणी अनुराधा पुरंदरे अटकेत

Published On: May 29 2018 1:34AM | Last Updated: May 29 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी 

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा रामचंद्र पुरंदरे (वय 61, रा. धनकवडी, पुणे) यांना आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी अटक करून सोमवारी दुपारी विशेष न्यायालयात हजर केले. डीएसके यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासोबत कंपनीत अनुराधा भागीदार आणि  गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात तिचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने सदर कारवाई करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी दिली आहे. दरम्यान, तिला न्यायालयाने 4 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

डीएसके प्रकरणात आतापर्यंत सुमारे 45 हजार जणांची एक हजार 83 कोटींची फसवणूक करण्यात आली असून, हा आकडा दोन हजार 43 कोटींपर्यंतचा आहे. आरोपींनी संगनमत करून पब्लिक लिमिटेड कंपनीचा पैसा जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या नावाखाली खोटे  दस्ताऐवज तयार करून आतापर्यंत 136 कोटींची फसवणूक केल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले. 

अनुराधा पुरंदरे या हेमंती कुलकर्णी यांच्यासोबत वेगवेगळ्या कंपनीत कार्यरत होत्या.  डीएसकेडीएल या कंपनीच्या माध्यमातून गृहप्रकल्पांसाठी बनावट कंपनी स्थापन करून त्याद्वारे जमीन खरेदी करण्यात येऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक  केली. अनुराधा पुरंदरे या लेखा विभागात सन 1985-86 पासून कामाला असून  त्या लेखा विभागाच्या उपाध्यक्षही होत्या. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती घ्यायची आहे.  यासाठी अनुराधा यांना पोलिस कोठडीची मागणी सरकारी पक्षाने केली.