Mon, Jul 22, 2019 05:13होमपेज › Pune › ‘अ‍ॅन्टीकरप्शन’ला संचालकच नाही

‘अ‍ॅन्टीकरप्शन’ला संचालकच नाही

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 1:24AMपुणे ः देवेंद्र जैन

सतीश माथूर यांची महाराष्ट्र पोलिस दलाचे महासंचालक म्हणून दीड वर्षांपूर्वी नियुक्ती करण्यात आली. त्याआधी माथूर अ‍ॅन्टीकरप्शनचे संचालक होते. डीजीपीनंतरची ही सर्वांत महत्त्वाची पोस्ट आहे. परंतु, गेल्या दीड वर्षांत राज्यभरात भ्रष्टाचार वाढला असतानाही ते पद आजही रिक्तच आहे. विवेक फणसळकर आपल्या दालनात बसून, लाचलुचपत खात्याची सूत्रे दीड वर्षांपासून हलवत आहेत. याचा अर्थ लाचलुचपत खात्याला एकही लायक महासंचालक मिळत नाही, असा घ्यायचा का? की पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सोयीच्या व कामाला येणार्‍या अधिकार्‍यांची मोक्याच्या ठिकाणी वर्णी लावण्यासाठी राज्यकर्ते थांबले आहेत? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

सद्यःस्थितीत पोलिस दलातील पदांचे गांभीर्यच सरकारला राहिले आहे की नाही, असा प्रश्‍न पडतो आहे. पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍याकडे उपमहानिरीक्षकपदाचा कार्यभार,  तर उपमहानिरीक्षकाकडे उपायुक्त पदाचा कार्यभार आणि उपमहानिरीक्षकाकडे महानिरीक्षकपदाचा  कार्यभार असल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

मध्यंतरी एका पक्षाचा शिक्का असलेल्या राकेश मारियांचा काटा काढण्यात आला. त्यांची मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बदल्यांमध्ये मोठ्या आर्थिक घडामोडी होणार असल्याची चर्चा सध्या पोलिस दलात सुरू आहे. अगदी ठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनाही ‘महासंचालक’ म्हणून बढती मिळण्याची शक्यता आहे. बदल्यांमध्ये मोठे ‘अर्थकारण’ दडलेले असते, हे आता लपून राहिलेले नाही. परंतु राज्यकर्त्यांनी गुणवत्तेशी प्रतारणा करू नये, इतकीच किमान अपेक्षा सामान्य पोलिसांकडून करण्यात येत आहे. गृहमंत्रिपद स्वतःकडे असलेल्या मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी. महाराष्ट्राला आतापर्यंत 40 पोलिस महासंचालक लाभले, परंतु पोलिसांच्या हक्कासाठी वेलफेअरसाठी फार कमी महासंचालक सरकारबरोबर लढले. त्यात अरविंद इनामदार यांचे नाव घ्यावे लागेल. अशा अधिकार्‍यांची महाराष्ट्र पोलिस दलाला आज गरज आहे.

सेवा ज्येष्ठते नुसार, सुबोध कुमार जैस्वाल जे 1985 बँचचे असून, त्यांचा सेवाकाळ सप्टेंबर 2022 अखेर संपत आहे, पण सद्यःस्थितीत ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत. त्यांच्या नंतर संजय पांडे हे असून, ते 1986च्या बँचचे आहेत व त्यांचा कार्यकाळ जून 2022 मध्ये संपत आहे. संजय बर्वे हे 1987 बॅचचे असून, त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2019 पर्यंत आहे. बिपीन बिहारी पण 1987 बॅचचे असून, सध्या ते राज्याचे कारागृह महासंचालक आहेत. त्यांचा कार्यकाळ जानेवारी 2021 पर्यंत आहे. सुरेंद्र पांडे हे 1987 बॅचचे असून, ते फेब्रुवारी 2021 मध्ये निवृत्त होणार आहेत. डी. कनकरत्नम हे 1987 बॅचचे असून, ते डिसेंबर 2020 मध्ये निवृत्त होत आहेत.

हेमंत नगराळे हे 1987 बॅचचे असून, त्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. परमबीर सिंग हे 1988 बॅचचे असून, ते जून 2022 मध्ये निवृत्त होत आहेत. पुण्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला या पण 1988 च्या बॅचच्या असून, त्या जून 2024 मध्ये निवृत्त होत आहेत. त्या व्यतिरिक्त रजनिश शेट डिसेंबर 2024, के. वेंकटेशन मे 2022, भूषण कुमार उपाध्याय नोव्हेंबर 2023, संजय कुमार मार्च 2023, राजिंदर सिंग एप्रिल 2022 मध्ये, तर प्रज्ञा सरोदे जून 2024 मध्ये निवृत्त होत आहेत. आता सरकार सेवेनुसार नेमणूक करते की सेवाज्येष्ठता डावलून, कोणाची आणि कुठे नेमणूक करते, ते जूनच्या शेवटच्या आठवड्यात कळेल.