Wed, Apr 24, 2019 01:56होमपेज › Pune › तंबाखूविरोधी दिन : हर फिक्र को धुंएँ मे उडाता चला गया...!

तंबाखूविरोधी दिन : हर फिक्र को धुंएँ मे उडाता चला गया...!

Published On: May 31 2018 1:45AM | Last Updated: May 31 2018 12:57AMआज व्यसनांचे प्रमाण सगळीकडेच वाढलेले आढळून येत आहे. व्यसनांची व्याप्तीही वाढलेली आहे. आज समाजात सर्वच प्रकारच्या व्यसनांच्या विळख्यात तरुणाई अडकताना दिसत आहे. ‘तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘दैनिक पुढारी’ने ‘तंबाखू आणि अर्थात निकोटिनशी निगडित व्यसन म्हणजे काय, त्याच्या परिणामाचा युवकांना केंद्रस्थानी ठेवून घेतलेला आढावा...

तंबाखू नक्‍की काय आहे...

तंबाखू भारतात उगवणारी एक वनस्पती आहे. हिची  पाने वाळवून, कुस्करून त्याला चुना मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. त्याच चुन्यापासून गुटखा बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशाकारक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरड्यांना लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून आणि अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. ऊस, काजू, कापूस, बांबू आणि मिरचीबरोबरच तंबाखू हे एक नगदी पीक म्हणूनही घेतले जाते.

फ्रान्सचा पोर्तुगालमधील राजदूत जाँ निको याने इ. स. 1560 मध्ये एका रुपेश बेल्जियन व्यापार्‍याकडून तंबाखू विकत घेतली. ही तंबाखू त्याने फ्रान्सच्या राणीला भेट दिली. वनस्पतींच्या ज्या वंशातून तंबाखू उद्भवते, त्याला याच जाँ निकोच्या स्मरणार्थ, ‘निकोटिन’ असे नाव दिले गेले. अल्कलॉइड या रासायनिक गटात मोडणारे निकोटिन हे द्रव्य तंबाखूच्या रोपट्याच्या मुळांमध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानांमध्ये साठवले जाते. रोपट्यातील जवळपास 64% निकोटिन पानांमध्ये असते असे मानले जाते. यामुळे तंबाखूच्या पानांचा उपयोग नशा येण्यासाठी केला जातो. न्यू मेक्सिको स्टेट विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात निकोटिनचे कीटकनाशक गुणधर्म वैज्ञानिकरीत्या सिद्ध झाले आहेत.

तंबाखूचे व्यसन...

निकोटिन वेगाने रक्तप्रवाहात मिसळू शकते. निकोटिन त्वचेतून शरीरात चटकन शिरतेच, परंतु धूम्रपानातील धूर किंवा तपकीर यांद्वारे ते श्वसनमार्गात सोडले की लागलीच रक्तात मिसळते. रक्तप्रवाहात शिरकाव झाल्यापासून 10-20 सेकंदांत ते संपूर्ण शरीरभर पसरते आणि महत्त्वाचे म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचून नशा चढल्याचा अनुभव देते. निकोटिन रक्तप्रवाहात मिसळले की आपल्या मनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची तात्पुरती व फसवी भावना निर्माण होते. निकोटिनचा हा परिणाम काही काळाने शुद्ध रक्त पुरवठ्याने कमी होतो. हीच भावना परत मिळविण्यासाठी पुन्हा निकोटिनचे सेवन केले जाते आणि थोड्याच काळात त्याचे व्यसन लागते. निकोटिन व्यसनी व्यक्तींना अल्झायमर्स, स्किझोफ्रेनिया मेंदूशी संबंधित रोग होण्याची शक्यता जास्त असते.

343 जणांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी  धूम्रपानास बंदी असूनही तो नियम सर्रास पायदळी तुडविला जात आहे. आणि ज्यांना अशा बेफिकीर लोकांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत, त्यांचेच दुर्लक्ष होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने 2017 -18 या आर्थिक वर्षांमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍या केवळ 343 जणांवर कारवाई करून, सुमारे 50 हजारांचा दंड वसूल केला आहे. वास्तविक पाहता ही कारवाई नगण्यच म्हणावी लागेल. 

पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश असून, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍यांवर आणि बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ विकणार्‍यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, विविध कारणे पुढे करून अन्न व औषध प्रशासन कारवाई करण्यास टाळत असल्याचे दिसून येत आहे. 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या एका वर्षामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यात केवळ 102 जणांवर कारवाई करून, त्यांच्याकडून 14 हजार 600 रुपये तर विभागामध्ये 241 धूम्रपान केल्याप्रकरणी 31 हजार 250 रुपयांचा दंड वसूल केला आहे. पुणे शहरात सर्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍यांची संख्या पाहिल्यास ही दररोज हजारांच्या वर जाऊ शकते. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे धूम्रपान करणार्‍यांचे फावते आहे.

एकूण कॅन्सर रुग्णांपैकी सर्वात जास्त, म्हणजे 50 टक्के कॅन्सर हे केवळ तंबाखू वापरामुळे होतात असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटना काढते. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास, तंबाखूमुळे होणारे कॅन्सरचे प्रमाण कमी करता येईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.  सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात खुलेआम सिगारेट फुंकणार्‍यांवर, तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीवर लगाम घालणे आवश्यक आहे. धूम्रपानामुळे होणार्‍या परिणामांची नागरिकांना देणे आवश्यक असून, त्यासाठी शासनस्तरावर योग्य ती पावली उचलणे आवश्यक आहेत.

कायद्याच्या अंमलबजावणीचं काय? 

सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात आणि व्यापार विनिमय, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण प्रतिबंध कायदा) अधिनियम 2003 हा केंद्राचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे असून, त्यापैकी कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. त्यासाठी 200 रुपये दंड ठोठावला जातो. तर, कलम 7 नुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. कलम 6 ब नुसार बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थविक्रीवर प्रतिबंध आहेत. या कायद्यानुसार 200 रुपये चलन पावती दंड किंवा बाल न्याय कायदा 2015 नुसार 1 लाख रुपये आणि सात वर्षांची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या कायद्यानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे, परंतु तसे होताना दिसून येत नाही.

आयुष्याची नवी सुरुवात

तंबाखूचे किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन ही इतर व्यसनांची पहिली पायरी समजली जाते. अशाच दोन युवकांचा या गर्तेतून यशस्वीपणे बाहेर येण्याचा प्रवास अनेक व्यसनाधीन तरुणांना उभारी देऊ शकतो. यात अडकलेल्यांना नक्कीच ही यशोगाथा प्रेरणादायी आहे. 

अभिजित काकड हा तरुण अवघा 26 वर्षांचा.  मात्र,  महाविद्यालयीन दिवसातच व्यसनाच्या आहारी गेलेला. 11वीत असताना हायप्रोफाईल मित्रमैत्रीणींमध्ये सुटेबल दिसावे म्हणून त्याने सिगरेटपासून व्यसनाला सुरुवात केली. पुढे सात ते आठ वर्षे या व्यसनाचा आलेख वाढतच गेला. आणि एका क्षणी त्याला जाणीव झाली की, आपण असं एका मिथकात राहण्यापेक्षा भानावर आलं पाहिजे. आयुष्यात एक ध्येय ठेवून निश्‍चित प्रवास केला पाहिजे. आणि  मग त्याचा प्रवास सुरू झाला पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या दिशेने. 

अभिजित सांगतो, खरं तर अनेक मुलांना व्यसनाची सवय मित्रमैत्रिणी किंवा घरातीलच वडीलधार्‍या माणसांकडून होते. घरातच वडील अथवा अन्य कोणी व्यसन करत असेल त्यालाही त्यात काही गैर वाटत नाही. मात्र हीच पहिली पायरी खूप घातक ठरते. आज मी सुमारे अडीच वर्षे संपूर्ण व्यसनमुक्त आहे. सध्या मुक्तांगणमधेच मी समुपदेशकाचे काम करतो. याशिवाय अधेमधे जाहिराती अथवा शॅार्टफिल्ममधे काम करतो. सध्या मी व्यायाम करून चांगली बॉडी कमावण्याचाही प्रयत्न करत आहे. एक आरोग्यपूर्ण आयुष्य जगणे माझ्यासाठी महत्त्वाचे ध्येय झालेले आहे. 

अभिजित त्याच्यासारख्याच तरुणांना सांगतो, की मित्रांनो व्यसनाच्या पहिल्या अनुभवालाच नकार द्या. यात कोणताही आनंद मिळत नाही. आयुष्यात येणार्‍या समस्यांना तोंड द्यायला शिका. समस्यांना टाळण्यासाठी व्यसन करण्यापेक्षा समस्यांना धीराने तोंड देऊन आनंदी होता येते. व्यसनात राहणे म्हणजे आभासी जगात वावरण्यासारखे आहे. त्यातून जागे झाले नाही तर संपूर्ण आयुष्य वेदनेत घालवावे लागते. मुक्तांगणच्या आधाराने मी माझे आयुष्य नव्याने सुरू केले, प्रत्येक व्यसनी माणूस हे नक्कीच करू शकतो, असा विश्‍वासही त्याने व्यक्त केला. 

मुक्तीने आरोग्य सुधारले

नीरज शेवडे हा 34 वर्षांचा तरुण. त्याच्या व्यसनी आयुष्याचा काळ तसा जास्त. मात्र आज तो या सगळ्यावर मात करून आयुष्याला सकारात्मकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या तोही पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. आठवीत असताना वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्याला सिगारेटचे व्यसन लागले. तो सांगतो की, आपल्या समाजात तंबाखू, सिगारेट याला एकप्रकारची समाजमान्यता आहे. यामुळे फार विशेष नुकसान सुरुवातीला दिसत नसल्यामुळे त्याला फार गांभीर्याने घेतले जात नाही. मात्र तंबाखू, सिगारेट यानंतरच दारू, ड्रग्ज, गांजा अशा घातक व्यसनांचा विळखा पडतो. त्यामुळे या पहिल्या व्यसनांच्या पायरीला, त्याविषयीच्या आकर्षणाला नाही म्हणायला आजच्या तरुणांना शिकवले गेले पाहिजे. तरच ते पुढच्या धोक्यापासून बचावतील. 

नीरज सांगतो की, आज तंबाखूजन्य पदार्थ शाळा-महाविद्यालयाच्या आसपास विकण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र, त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी सरकारने काही निश्‍चित धोरण आखले पाहिजे असे त्याला वाटते. नीरजच्या मते ‘व्यसनाचा पहिला प्रयत्न हा आयुष्य वाया जायला कारणीभूत ठरतो. आज तो अनेक वर्षांच्या व्यसनांच्या  विळख्यातून बाहेर आला आहे. मात्र आता गेले आठ ते दहा वर्षे तो सगळ्या व्यसनातून मुक्त आहे. हेच सध्या त्याच्या आयुष्यातील मोठे यश आहे असे तो समजतो. 

तरुणांमध्ये वाढती नशा

तरुणांमध्ये सिगारेट, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची नशा वाढल्याचे धक्कादायक चित्र पाहणीतून दिसून आले. तंबाखू सेवनाला व सिगारेटचे झुरके ओढण्याला एका प्रकारचे ग्लॅमर दिले गेल्याने तरुणांमध्ये त्याचा शौक प्रचंड वाढला आहे. 

तंबाखू मळतच दिवसाची सुरूवात करणारे अनेक जण दिसत असून एकवेळ जेवण्यास मिळाले नाही तरी चालेल, मात्र तंबाखू मात्र वेळच्या वेळी हवीच, अशी मानसिकता तरुणांमध्ये वाढलेली दिसून येते. त्याच्या किकमुळे अनेक जण त्याच्या आहारी गेले असून, 18 ते 25 या वयोगटातील मुलांमध्ये याचे प्रमाण लक्षणीय असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

पुण्यातील एका टपरीचालकाशी संवाद साधला असता तो म्हणाला की, दररोज सुमारे शंभर सिगारेट, दोनशे पानमसाला, तंबाखूची पाकिटे विकली जातात. यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असून, दर दहा व्यक्तींमध्ये आठ व्यक्ती 20 ते 30 या वयोगटातील आहेत.  अभिजित वाघ (नाव बदलले आहे) या 35 वर्षीय तरूणाने सांगितले की वयाच्या 20 व्या वर्षीपासून मी सिगारेट ओढत असून एखादा झुरका ओढ रे, काही होत नाही, असे माझ्या मित्रांनी मला सांगितले. त्यांचे ऐकत मी पहिली सिगारेट ओढली. कालांतराने मला ती किक आवडू लागली व त्याच्या आहारी मी गेलो.

टीम पुढारी : सुनील जगताप, महेंद्र कांबळे, ज्ञानेश्‍वर भोंडे, हिरा सरवदे,समीर सय्यद,  नरेंद्र साठे, प्रसाद जगताप, अक्षय फाटक, ज्योती भालेराव-बनकर.