होमपेज › Pune › विद्यापीठात शेअरिंगअंतर्गत आणखी २७५ सायकली

विद्यापीठात शेअरिंगअंतर्गत आणखी २७५ सायकली

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 10 2018 11:53PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पब्लिक सायकल शेअरिंग सेवेला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता पुणे स्मार्ट सीटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे विद्यापीठात 275 सायकली आणखी वाढविण्यात येणार आहेत. ओफो कंपनीच्या सहकार्याने 275 सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या असून सुरुवातीला 90 दिवसांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

पुणे स्मार्ट सीटीअंतर्गत विद्यापीठात ‘झूमकार पेडल’च्या सहकार्याने 5 डिसेंबर 2017 रोजी विद्यापीठात ही सायकल शेअरिंग सेवा सुरू करण्यात आली होती. विद्यापीठात 100 सायकली, तर औंधमध्ये 75 सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आतापर्यंत तब्बल 26 हजारांहून अधिक पुणेकरांनी या सेवेचा लाभ घेतला असून सायकल सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून ‘ओफो’च्या 275 सायकली मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर 90 दिवस मोफत सेवा दिल्यानंतर मिळणार्‍या प्रतिसादानुसार पुढे नाममात्र शुल्कामध्ये ही सेवा देण्यात देण्यात येणार असल्याचे पुणे स्मार्ट सीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले. 

अशा आहेत ‘ओफो’च्या सायकली 

ओफो ही सायकल शेअरिंग कंपनी असून, 20 देशांमध्ये त्यांच्या एक कोटीहून अधिक सायकली उपलब्ध आहेत. सुमारे 20 कोटी लोक ही सेवा वापरत असून स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशनवरून अनलॉक करून इतर देशांमध्ये ही सेवा सशुल्क उपलब्ध आहे. ओफो अ‍ॅपमधून सायकल लॉक आणि अनलॉक करता येतेच, शिवाय त्या सायकलचे पार्किंग कुठे केले आहे हेही पाहता येते.

तसेच जीपीएस तंत्रज्ञान वापरून या सायकली पूर्णतः सुरक्षित बनवल्या आहेत. पिवळ्या रंगातील या सायकली 24 तास वापरता याव्यात या दृष्टीने त्यांना डायनामो आणि लाईट हेदेखील बसवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे बनवण्यात आल्यामुळे या सायकली वजनाने हलक्या, मजबूत आणि चालवण्यास आनंददायी अशा आहेत, असे ओफोचे संपर्क विभागाचे संचालक राजर्षी सहाय यांनी सांगितले.