Sun, Nov 18, 2018 03:08



होमपेज › Pune › वैद्यकीय प्रवेशाची सुधारित गुणवत्ती यादी जाहीर

वैद्यकीय प्रवेशाची सुधारित गुणवत्ती यादी जाहीर

Published On: Apr 27 2018 1:06AM | Last Updated: Apr 27 2018 12:41AM



पुणे : प्रतिनिधी 

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या व्यवस्थापन कोट्यासाठी चारपट शुल्क आकारण्यावर एकमत झाल्यावर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमडी, एमएस आदी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पहिली सुधारित गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर केली. मात्र, उद्या शनिवार दि. 28 एप्रिलपासून बँकांना सलग चार दिवस सुट्ट्या असल्याने विद्यार्थ्यांनी लाखो रुपयांचे शुल्क भरायचे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

व्यवस्थापन कोट्याच्या पाचपट शुल्कवाढीसाठी राज्यातील सात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यापूर्वी प्रकाशित केलेल्या पहिल्या प्रवेशाच्या यादीतील दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले होते. मात्र, आता महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यासाठी चारपट शुल्क आकारण्याला सहमती दर्शविल्याने पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार सीईटी सेलने प्रवेशाची सुधारित यादी गुरुवारी दुपारी प्रकाशित केली. यामध्ये प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसोबतच सर्वांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या नव्या प्रवेश प्रक्रियेनुसार विद्यार्थ्यांना 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसांत प्रवेश घ्यायचे आहेत. खासगी महाविद्यालयांचे शुल्क हे प्रतिवर्षे 10 ते 12 लाखांच्या दरम्यान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्काची रक्कम जमविण्यासाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. अशातच उद्या 28 एप्रिल ते 1 मेपर्यत म्हणजेच सलग चार दिवस बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी मिळणार आहे. या एका दिवसात डीडी काढणे, कॅशमध्ये रक्कम भरणे किंवा शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया करणे अशा प्रक्रिया करून प्रवेश घ्यावे लागणार आहे.

यातच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एका ठिकाणावरून महाविद्यालय असणार्‍या ठिकाणी जावे लागणार आहे. अशी परिस्थिती असतानादेखील सीईटी सेलने प्रवेशासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. यातील दोन दिवस सुट्ट्या असल्याने प्रवेशाची प्रक्रिया कशी पूर्ण करणार, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे प्रवेशाचा कालावधी 5 मेपर्यंत वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली असून त्याबाबतचे निवेदन सीईटी सेल, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डीएमईआर), एमसीआय आदी सरकारी यंत्रणांना देणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे सीईटी सेलचा भोगळ कारभार चव्हाट्यावर आला असून त्याचा विद्यार्थी आणि पालकांना त्रास होत आहे.