होमपेज › Pune › आशा भोसले पुरस्कार उदित नारायण यांना जाहीर 

आशा भोसले पुरस्कार उदित नारायण यांना जाहीर 

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 1:18AMपिंपरी : प्रतिनिधी 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने भारतीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल देण्यात येणारा ‘आशा भोसले पुरस्कार’ यंदा गायक उदित नारायण यांना देण्यात येणार आहे. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे शनिवारी (दि. 4) सायंकाळी साडेपाच वाजता हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने 2002 पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावाने आशा भोसले पुरस्कार दिला जातो. यंदा पुरस्काराचे 16 वे वर्ष आहे.यंदाचा 16 वा पुरस्कार सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण उदित नारायण यांना देण्यात येणार आहे.

रोख 1 लाख 11 हजार रुपये व शाल व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार पंडित ह्दयनाथ मंगेशकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उदित नारायण यांच्या गीतावर आधारित रजनीगंधा तसेच वैशाली पळसुले यांचे फ्युजन नृत्य हा कार्यक्रम विनामूल्य होणार आहे.