Sat, Jul 20, 2019 15:55होमपेज › Pune › महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी भापकरांचे अण्णा हजारेंना साकडे

महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी भापकरांचे अण्णा हजारेंना साकडे

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 17 2018 1:25AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये भाजप सत्ताकाळात गेल्या आठ महिन्यांत सुमारे 800 कोटी रकमेपेक्षा अधिक रकमेची कामे मंजूर झाली आहेत. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांना घालावे, अशी मागणी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे केली केली आहे. 

भापकर यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची मंगळवारी (दि. 16) भेट घेतली. महापालिकेतील भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे त्यांच्याकडे दिले आहेत. यात 425 कोटी रुपयांचे रिंग केलेले रस्ते तसेच विकासकामांच्या कागदपत्रांचा समावेश आहे.

सन 2016-17 या आर्थिक वर्षात रस्त्यांच्या 428 निविदा निघाल्या. यामध्ये आयुक्त, पदाधिकारी, अध्यक्षा, ठेकेदार आणि सल्लागर यांनी संगनमत करून करदात्यांच्या 80 ते 90 कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. विविध विकासकामांध्ये रिंग केली जात आहे. ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून अटी-शर्ती निश्‍चित केल्या जात आहेत. एका ठेकेदारांनी एकाच संगणकावरुन निविदा भरल्याचे उघड देखील झाले आहे. तरीदेखील आयुक्त यावर कोणतेही कार्यवाही करत नाहीत, असा भापकर यांचा आरोप आहे. 

आयुक्त, पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या संगनमतातून आठ महिन्यात तब्बल 41 लाख 27 हजार चौरस फुटांच्या सुमारे 5 हजार 300 कोटी रुपये किंमतीच्या  टीडीआरचे वाटप करण्यात आले आहे. यातही कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. महापालिकेत उच्चशिक्षित अभियंते असताना, स्वतःच्या फायद्यासाठी सल्लागारांची नेमणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, ते कुठलीही ठोस कारवाई न करता भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे आयुक्त व पदाधिकारी यांच्या सर्व निर्णयांची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी व कारवाई व्हावी, यासाठी हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करावी, अशी आग्रही मागणी भापकर यांनी केली. संबंधित प्रकरणे खूप गंभीर असून त्यावर अभ्यास करून लवकरच त्याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहीन असे आश्‍वासन हजारे यांनी दिल्याचे भापकर यांनी सांगितले.