Sun, May 26, 2019 00:38होमपेज › Pune › अण्णा भाऊंच्या ‘साहित्यरत्न’ उपाधीची बार्टीला अ‍ॅलर्जी! 

अण्णा भाऊंच्या ‘साहित्यरत्न’ उपाधीची बार्टीला अ‍ॅलर्जी! 

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 29 2018 1:11AMपुणे : राहुल अडसूळ

लोकशाहीर कॉ. तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांचे  साहित्यामधील योगदानाची दखल घेत, पाच वर्षांपूर्वी राज्य शासनाने अध्यादेश काढून त्यांचा उल्लेख ‘साहित्यरत्न’ असा करण्याचा आदेश सर्व विभागांना जारी केला; मात्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी याच विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) केलेली नाही. 

अण्णा भाऊंच्या यंदाच्या 98 व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘राज्यस्तरीय गायन स्पर्धे’साठी बार्टीने अर्ज मागवले आहेत. यासाठी वृत्तपत्रात प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरातीमध्ये त्यांचा केवळ लोकशाहीर असा नामोल्लेख करण्यात आला आहे. या गंभीर चुकीबद्दल साधी दिलगिरीही व्यक्त करण्याचे सौजन्यही बार्टीने दाखवलेले नाही. त्यामुळे अण्णा भाऊप्रेमी आणि अभ्यासकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबद्दल राज्यभरातून अनेकांनी बार्टी कार्यालयात दूरध्वनी करून ही चूक लक्षात आणून दिली. तरीही  बार्टीला  याचे गांभीर्य दिसत नाही. कारण अद्यापही या चुकीबद्दल जाहीर माफी मागितलेली नाही किंवा चूक दुरुस्त करून त्याबाबतचे शुद्धिपत्रक छापलेले नाही. बार्टीच्या फेसबुक पेजवर ही जाहिरात अद्यापही झळकत आहे. किमान सोशल मीडियावर तरी विनाविलंब आणि विनाखर्चात दिलगिरी व्यक्त करता आली असती. हेही बार्टीकडून झालेले नाही. त्यामुळे हा प्रकार मुद्दाम केला की काय, अशी शंका मातंग समाजातून व्यक्त होत आहे. 

बार्टीकडून अण्णा भाऊंच्या सन्माननीय संबोधन उल्लेखासंदर्भात अनावधानाने चूक घडल्याची शक्यता आहे. परंतु हा प्रकार मुद्दाम झाला असेल तर तो खोडसाळपणा आहे. याप्रकरणी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून भावना दुखावल्याच्या उत्कट प्रतिक्रिया वेगवेगळ्या माध्यमांतून उमटल्या आहेत. बार्टीकडेही आल्या असतील. यावर बार्टीने तातडीने जाहीर दिलगिरी व्यक्त करून समाजाच्या भावना जपायला हव्या होत्या.  -प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे, इंग्रजी विभागप्रमुख, य. च. महाविद्यालय, अंबाजोगाई

मराठी साहित्यात वाङ्मयाच्या सर्व प्रकारात विपुल लेखन केलेले असताना केवळ लोकशाहीर अशा नामोल्लेखातून अण्णा भाऊंच्या कर्तृत्वाला न्यून लेखण्याची वृत्ती जाणवते. त्यामुळे बार्टीच्या जाहिरातीत ‘साहित्यरत्न’ असा उल्लेख आवश्यक  आहे. त्यांनी त्यात दुरुस्ती करायला हवी होती.  -डॉ. माधव गादेकर, लातूर, सदस्य, अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समिती

केवळ लोकशाहीर अशा उल्लेखाने समाजात वेगळा संदेश जातो. अण्णा भाऊंना आणखी किती दिवस उपेक्षित ठेवायचे? मातंग समाजाच्या भावना दुखावल्या. अस्मितेला धक्का लागला. त्यामुळे विनाविलंब शुद्धिपत्रक अपेक्षित होते.  - डॉ. अश्रू जाधव, (नागपूर) सदस्य, अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समिती

अण्णा भाऊंना साहित्यरत्न संबोधनाचा सामाजिक न्याय विभागाचा ‘जीआर’ आहे, याबद्दल बार्टीला माहीत नाही असे होऊ शकत नाही. महापुरुषाचा अवमान झाला. याबद्दल तातडीने समाजाची माफी मागावी.  -सतीश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, पुणे

जाहिरातीत अण्णा भाऊंचा ‘साहित्यरत्न’ असा नामोल्लेख अनावधानाने राहून गेला आहे. अण्णा भाऊंच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या 1 ऑगस्ट रोजी अभिवादनासंदर्भातील जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यात ही चूक दुरुस्त करण्यात येईल.  -आरती डोळस, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकाशन व प्रसिद्धी विभाग, बार्टी.