Thu, Apr 25, 2019 05:41होमपेज › Pune › लाळ, खुरकत लसींबाबत शासनाची उदासीनता

लाळ, खुरकत लसींबाबत शासनाची उदासीनता

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:19AM

बुकमार्क करा
पुणे : नवनाथ शिंदे

ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या पशुधनाची काळजी घेण्याबाबत शासनाच्या अंदाजपत्रकात कोट्यवधींची तरतूद केली जाते. प्रत्यक्षात मात्र, योजना अंमलबजावणी किंवा लसीच्या खरेदीची उदासीनता आणि जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाची अकार्यक्षमता जनावरांच्या जीवावर बेतू शकते. जनावरांना लाळ, खुरकत रोगांची लागण होऊ नये म्हणून दरवर्षी जिल्ह्यातील जनावरांना लसीकरण केले जाते. मात्र, 2017-18 च्या आर्थिक वर्षात शासन स्तरावरून लसीचा पुरवठा झाला नाही, त्यामुळे ऐन हिवाळ्यात लाळ, खुरकतीच्या लसीपासून जनावरे वंचित आहेत. 

जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, पशुपालकांकडून दुग्धव्यवसायासाठी जनावरांचे पालन केले जाते. त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो. गावरान गाई, शेतीकामासाठी बैलजोडी, जर्सी जातीच्या गाई, पंढरपुरी, मेहसाना, जाफराबादी म्हशींद्वारे दुग्धव्यवसाय केला जातो. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अ श्रेणीचे 90 तर ब श्रेणीचे 217 दवाखान्यांच्या माध्यमातून उपचार केले जातात. दरम्यान, हिवाळ्याच्या दिवसामध्ये जनावरांमध्ये लाळ खुरकत आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीची खरेदी केली जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून लस खरेदीची प्रक्रिया शासन स्तरावरून केली जात आहे. त्यामुळे 2017-18 च्या आर्थिक वर्षांत लसीची खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे लसीअभावी जनावरांमध्ये लाळ खुरकत आजाराचे प्रमाण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे.

विविध तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये लाळ खुरकत लस उपलब्ध नाही. त्यामुळे जर  जनावरांना आजारांचा प्रार्दुभाव झाला तर  त्यावर उपचार करू, अशी हास्यास्पद माहिती स्थायी समितीच्या बैठकीत विभागप्रमुखांनी दिली आहे. एकंदरीत पशुसंवर्धन विभागाकडून शासनाकडे  लसीच्या पाठपुराव्याबद्दल आग्रह धरण्याची मागणी सदस्यांकडून केली जात आहे. मात्र, लस खरेदीची शासनस्तरावर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 

त्यामुळे हिवाळा संपल्यानंतर जनावरांना लाळ खुरकत लसीकरण  झाल्यास  आजारांचा प्रादुर्भाव थांबविण्यास मदत होणार नसल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यात 2008 च्या पशुगणनेनुसार संकरित गाईंची संख्या 4 लाख 10 हजार  तर देशी गाईंची आकडेवारी 3 लाख 72 हजार आहे. एकूण ही संख्या  7 लाख 80 हजारांवर पोहचते.  तर विविध जातींच्या म्हशींची संख्या 3 लाख 4 हजार आहे. तसेच घोडे, गाढव आणि उंटांची आकडेवारी 5 हजार 220 आहे. 

एकूण जनावरांची संख्या 11 लाखांवर आहे. दरम्यान 2008 च्या पशुगणनेनंतर 2017 मध्ये जनावरांची आकडेवारी 20 लाखांवर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हिवाळा संपण्याआधी जिल्ह्यातील जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. यासंदर्भात कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.