Tue, Mar 19, 2019 05:29होमपेज › Pune › आमदार भोसले-राष्ट्रवादीचे मनोमिलन!

आमदार भोसले-राष्ट्रवादीचे मनोमिलन!

Published On: Mar 12 2018 12:53AM | Last Updated: Mar 12 2018 12:38AMपुणे : पांडुरंग सांडभोर

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांचे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी मनोमिलन होत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीची नेतेमंडळी आणि आमदार भोसले यांच्यात पुन्हा जवळीक वाढत चालली आहे; त्यामुळे एकमेकांमधील टोकाला गेले वाद मिटून भोसले पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय होणार का, याची उत्सुकता वाढली आहे.

गतवर्षी ऐन महापालिका निवडणुकीत प्रभागातील उमेदवारांच्या निवडीवरून आमदार भोसले यांचा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी वाद झाला होता. त्यानंतर भोसले यांनी थेट बंडाचा पवित्रा घेऊन, पत्नी रेश्मा यांना भाजपकडून उमेदवारी दिली. भाजपच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवून रेश्मा भोसले या निवडूनही आल्या; मात्र या सर्व घडामोडींत आमदार भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संबंध अधिकच ताणले गेले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भोसले यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली होती, तर भोसले यांनीही त्यास जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे काम केले होते. त्यानंतर भोसले यांना पक्षाने कारवाईसाठी नोटीसही बजावली होती, मात्र, प्रत्यक्षात कारवाई करण्याचे पक्षाने टाळले होते. 

आता वर्ष-सव्वा वर्षानंतर भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील टोकाला गेलेले संबंध पुन्हा सुधारत असल्याचे चित्र आहे. याचा प्रत्यय नुकताच एका समारंभात पाहायला मिळाला. सिंचननगर येथे बोन्सायचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांच्या कुंटुबातील सदस्य व जवळचे मित्र उपस्थित होते. आमदार भोसलेही या वेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीशी झालेल्या मतभेदांनंतर भोसले आणि पवार हे पहिल्यांदाच समोरासमोर आले होते.

मात्र, पवार यांनी भोसले यांना आवर्जून बोलावून घेऊन, त्यांच्याशी चर्चा केली. या ठिकाणच्या भोजनाच्या कार्यक्रमातही त्यांनी भोसले यांना जेवणाचा आग्रह केला; त्यामुळे ही दिलजमाई आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आमदार भोसले आणि अजित पवार यांच्या संबंधात सुधारणा झाली असून, हे दोघेही नेते एकमेकांशी चर्चा करत असतात, असेही राष्ट्रवादीतील सूत्रांकडून सांगण्यात आले; त्यामुळे आगामी काळात शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळे चित्र दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.