Mon, Jun 24, 2019 16:41होमपेज › Pune › चाकणमध्ये जमावाची दगडफेक; बाजारपेठ बंद

चाकणमध्ये जमावाची दगडफेक; बाजारपेठ बंद

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:44AMराजगुरुनगर : वार्ताहर

गुरुवारी (दि. 15) रात्री चाकण येथील शिवाजी विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी अनिकेत संदीप शिंदे (वय 16) याचा खून व ओंकार मनोज बिसनारे (वय 17) याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी चाकणमधील आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.  गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.   दरम्यान संबंधित थरारक घटनेनंतर शुक्रवारी (दि. 9) सकाळी काही संतप्त तरुणांच्या जमावाने चाकणमधील बाजारपेठ व माणिक चौकाजवळील काही दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर चाकणमधील बहुतांश दुकाने बंद करण्यात आली होती.   

ओंकार झगडे,   किरण धनवटे,   तेजस रेपाळे,   पप्पू धनवटे,   नितीन पंचरास,   वृषभ देशमुख,   महेंद्र ससाणे,   परेश गुंडानी (सर्व रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) या आठ जणांवर खून व प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण धनवटे, तेजस रेपाळे, पप्पू धनवटे या तिघांना मध्यरात्रीच चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   

जखमी ओंकार बिसनारे याची फिर्याद चाकण येथील एका खासगी रुग्णालयातून चाकण पोलिसांनी घेतली आहे.   बिसनारे याच्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि.  14) अनिकेत शिंदे याने संशयित आरोपी ओंकार झगडे याला फोन करून तू आम्हाला येता-जाता कुत्रा का म्हणतो, असा जाब विचारला होता. त्यावर झगडे त्याला म्हणाला, तुम्ही विरुद्ध गँगचे आहात; त्यामुळे तुम्हाला कुत्रा नाही तर काय म्हणायचे. यावरून त्यांच्यात शिवीगाळ व शाब्दिक भांडणे झाली होती. त्याचाच राग मनात धरून ओंकार झगडे याने गुरुवारी (दि. 15) रात्री साडेसात वाजता फोन करून अनिकेत शिंदे यास तुझ्या दुकानात येतो असे सांगितले होते.   त्यावर अनिकेतने दुकानात नको, संग्रामदुर्ग किल्ल्यात ये असे सांगितले होते.  

ठरल्याप्रमाणे अनिकेत शिंदे,  ओंकार बिसनारे व त्यांचा आणखी एक तिसरा साथीदार टिल्ल्या ऊर्फ रामनाथ सुखदेव घोडके हे किल्ल्यात जाऊन थांबले होते. त्यावेळी ओंकार झगडे व किरण धनवटे आणि अन्य साथीदार कोयते घेवून आले.  ओंकार झगडे याने फिर्यादी ओंकार बिसनारे याच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावली व ट्रिगर दाबला; परंतु गोळी फायर झाली नाही. त्यामुळे अनिकेत शिंदे व ओंकार बिसनारे त्यांच्या तावडीतून सुटून पळत असताना अनिकेत शिंदे ठेच लागून खाली पडला. मागून धावत आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने अनिकेत याच्या शरीरावर, वार केले आणि मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला व जागीच ठार केले. पोलिसांच्या ठोस आश्वासनानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला व दुपारी अंत्यसंस्कार केले.