Thu, Apr 25, 2019 07:35होमपेज › Pune › विरोधकांसह सत्ताधारी ‘पीएमपी’ सेवेबाबत नाराज

विरोधकांसह सत्ताधारी ‘पीएमपी’ सेवेबाबत नाराज

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 18 2018 12:48AMपिंपरी : प्रतिनिधी

‘पीएमपी’च्या  पिंपरी-चिंचवड शहरातील सेवेबाबत सत्ताधार्‍यासह विरोधी नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त करीत शहरातील सार्वजनिक वाहतुक सक्षम करण्याची आग्रही मागणी पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्याकडे केली. शहरातील वाहतुक व्यवस्था कमकुवत असताना पालिकेने संचलन तुटीपोटी निधी का द्यावा, असा सवाल त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. शहरातील विविध समस्यांबाबत पदाधिकारी व सदस्यांनी त्याच्या समोर पाढा वाचला. 

शहरातील पीएमपीसंदर्भात नगरसेवकांच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करावे, अशी आग्रही मागणी स्थायी समितीने वारंवार केली होती. नयना गुंडे या प्रशिक्षणासाठी एक महिना सुटीवर असल्याने त्याचे आयोजन करता आले नाही. ती कार्यशाळावजा बैठक नुकतीच पालिकेत झाली. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, विविध विषय समिती सभापती, क्षेत्रीय अध्यक्ष, नगरसेवक व अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर आणि अधिकारी उपस्थित होते. 

स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी म्हणाले की, पीएमपीला वार्षिक एकदाच निधीस मंजुरी न देता तो दरमहिन्यास दिला जात आहे. शहरासाठी मध्यवर्ती कार्यालय सुरू करून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीस मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी गुंडे यांचे आभार मानले. पिंपर-चिंचवड दर्शनच्या 10 वातानुकुलीत बससंदर्भात तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली. डेेपोसाठी प्राधिकरण 25 टक्के मोबदला मागत असून, त्या शासनाच्या नियमाद्वारे त्याची मोफत मागणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला. 

मनसेचे सचिन चिखले म्हणाले की, शहरातील अनेक बसथांब्याचे छत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना उन व पावसात थांबावे लागते. अनेक बस रस्त्यातच बंद पडतात. काही बस पेटल्या आहेत. तर, निगडीत बस खाली येऊन एकाचा मृत्यू झाला आहे. या तक्रारीवर उपाययोजना करून नागरिकांना सक्षम बस सेवा देण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील प्रवाशांच्या बस सेवेबाबत अनेक तक्रारी आहेत. फेर्‍या रद्द होतात. बस उशीरा येते. बसण्यास जागा मिळत नाही. अंतर्गत भागांत बसच येत नाही. बस मध्येच बंद पडतात. ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. पालिकेने कोट्यावधीचा निधी देऊनही शहरासाठी या प्रकारे बस सुविधा दिली जात असल्याबद्दल विरोधी पक्षनेते साने यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. 

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या तुलनेत येथे बसची संख्या अपुरी असल्याची तक्रार भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली. पिंपरी गावासाठी केवळ तीनच बस असून, पिंपरी चौकात उतरून गावात ये-जा करावी, लागत असल्याची खंत व्यक्त केली. वाकड परिसरातून थेट पिंपरीत ये-जा करण्यासाठी बस नाहीत. अनेक मार्ग सोईचे नाहीत. तक्रार देण्यासाठी पुण्यात जावे लागते, अशा तक्रारी राहुल कलाटे यांनी मांडल्या. 

बस पेटण्यासंदर्भात ‘फायर ऑडिट’ 

सीएनजी बस पेट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचे ‘फायर ऑडिट’ करण्यात येत आहे. वाहनांमध्ये ‘फायर सेफ्टी किट’ बनविण्यात येत आहेत. निगडीत बस खाली येऊन झालेला अपघातात एकाचा मृत्यू झाला. हा प्रकार चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाला असून, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे नयनागुंडे यांनी सांगितले. तसेच, पीसीएमटी विलीनीकरणानंतर शहरात बस व फेर्यात वाढ केली आहे. शहरातील काही बस थांब्यांना छत नसल्याचे त्यांनी कबुल केले. शहरातील रखडलेले नियोजित बीआरटीएस मार्ग पूर्ण कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. नवीन बस प्राप्त झाल्यानंतर शहरातील मागण्यानुसार नव्या फेर्यावर बस सुरू केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.