Fri, Apr 26, 2019 03:23होमपेज › Pune › आंगणवाडी शिक्षिका, सेविकांसाठी ठोस धोरण करा

आंगणवाडी शिक्षिका, सेविकांसाठी ठोस धोरण करा

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या शाळा टिकवण्याचे काम शहरातील आंगणवाड्यांच्या माध्यमातून केला जातो. मात्र विद्यार्थ्यांचा पाया मजबुत करणार्‍या आंगणवाडी शिक्षिका आणि सेविकांची परिस्थिती दयनिय आहे. या सेविकांना योग्य पद्धतीने मानधन मिळण्यासाठी आणि पालिकेच्या इतर कर्मचार्‍याप्रमाणे सेवा सुविधा मिळाव्यात, यासाठी एक धोरण तयार करावे, अशी माहिती सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्यसभेत केली. यावेळी नगरसेवकांनी पालिकेकडून चालविल्या जाणार्‍या क्रीडा निकेतनमधील विविध प्रश्नही चव्हाट्यावर आणले. दरम्यान आपल्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी आंगणवाडी सेविकांनी नगरसेवकांना गुलाब फुले देत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. 

शहरातील विविध भागात महापालिकेच्या वतीने चालविल्या जाणार्‍या आंगणवाड्यांमध्ये काम करणार्‍या 6200 सेविका काम करतात. त्यांना प्रतिमहा फक्त 8 हजार 200 रुपये मानधन दिले जाते. हे मानधन इतर महापालिकेतील सेविकांच्या तुलनेत खूपच कमी आहे. इतर पालिकांच्या सेविकांना 12 हजारापेक्षा जास्त मानधन मिळते. नवी पिढी घडविण्याचे महत्ताचे काम करणार्‍या सेविकांची आवस्था अशी का ?  त्या घरोघरी जाऊन पटसंख्या गोळा करतात. त्यांना संरक्षण दिले जाणे गरजेचे आहे. शिक्षक आणि सेविकेच्या पगारावर चर्चा करावी लागते, हे दुर्दैवी आहे. सेविकांचे आणि शिक्षकांचे मानधन बांधकामांवर काम करणार्‍यांपेक्षा कमी आहे. 

पालिकेच्या सेवकांना ज्या सेवा सुविधा मिळतात, त्या सेविकांना द्याव्यात आणि त्यांना पालिकेच्या आकृतिबंधामध्ये स्थान द्यावे. या सेविकांच्या मानधनामध्ये दर वर्षी 10 टक्के वाढ होणे गरजेचे आहे. शिवाय त्यांना वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे आहे. याशिवाय सेवानिवृत्त होणार्‍या सेविकांचा सन्मान होणे गरजेचे आहे. यासाठी योग्य ते धोरण केले जाणे गरजेचे आहे, अशी मागणी विविध नगरसेवकांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पालिकेच्या मुख्य सभेत केला. सेविकांचा प्रश्न सोडविला गेला नाही तर पालिकेच्या शाळांना कुलूप लावावे लागेल, असा इशाराही यावेळी दिला. नगरसेविका राजश्री शिळीमकर, विशाल तांबे, रघु गौडा, अविनाश साळवे, आश्विनी कदम, आनंद रिठे, धिरज घाटे, शंकर पवार, प्रशांत जगताप, प्रवीण चोरबेले यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

मागे काय झाले हे न पाहता योग्य तो धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली. तर या सेविकांमध्ये अनेकांचे बीएड, डीएड शिक्षण झाले आहे. यापुढील कालावधीत नवीन शिक्षिकांची भरती करते वेळी या सेविकांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. आपल्या सेवेचा सन्मान केला, असे त्यांना वाटायला हवे. तसेच पालिकेची शिक्षण समिती आणि शाळा सुधार समितीची नेमणूक त्वरित करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. 

आंगणवाडी शिक्षिका व सेविकाच्या प्रश्नांवर चर्चा करून ते सोडविण्यासाठी मी वारंवार बैठका घेतल्या आहेत. लवकरच समकक्ष महापालिकांमधून माहिती घेऊन सेविकांना विविध लाभ देण्यासंबंधी एक धोरण तयार करून मुख्य सभेसमोर ठेवले जाईल, असा खुलासा अतिरीक्त पालिका आयुक्त शीतल उगले यांनी केला.