होमपेज › Pune › अंगणवाडी पोषण आहारावर प्रशासनाची ‘करडी नजर’

अंगणवाडी पोषण आहारावर प्रशासनाची ‘करडी नजर’

Published On: Feb 16 2018 1:51AM | Last Updated: Feb 16 2018 12:09AMपुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अंगणवाड्यांत पूर्व प्राथमिक शिक्षण घेणार्‍या बालकांना ठेकेदाराच्या वतीने पुरविण्यात येणार्‍या पोषण आहारासह कडधान्यावर प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

ठेकेदाराकडून जिल्हा परिषदेला मटकी, डाळ, हरभरा, तांदळाच्या सादर केलेल्या नमुन्याचाच पुरवठा 13 तालुक्यांत करावा लागणार आहे. नमुन्याप्रमाणे कडधान्यांचा पुरवठा न केल्यास ठेकेदाराचे बिल जिल्हा परिषदेकडून काढण्यात येणार नसल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके यांनी दिली. अंगणवाड्यांमध्ये बालकांना दिल्या जाणार्‍या पोषण आहार आणि कडधान्यांसंदर्भात वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार ठेकेदाराकडून पुरविण्यात येणार्‍या मालाचा नमुना घेतला जाणार आहे. 

जिल्ह्यातील बालकांना स्वच्छ आणि ताजा पोषण आहार देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान ठेकेदाराने कडधान्ये, मिरची-मसाला, तांदळाचा नमुन्याप्रमाणे पुरवठा करावा. जिल्हा परिषदेत कडधान्याचा दिलेला नमुना आणि वितरण करताना दुसरा माल, अशी बनवाबनवी खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी अंगणवाडी सेविकांनी सजग राहून कडधान्याबाबत तक्रार असल्यास बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांकडे दाखल करावी.   -राणी शेळके, सभापती, महिला व बालकल्याण समिती