Sun, Aug 18, 2019 14:49होमपेज › Pune › अर्धी भाऊबीज देणारा मुख्यमंत्री भाऊ नकोच

अर्धी भाऊबीज देणारा मुख्यमंत्री भाऊ नकोच

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:41PMपिंपरी : प्रतिनिधी 

मानधनात वाढ करतो, भाऊबीज दुप्पट करतो असे, आश्वासन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये अंगणवाडीताईंना राज्यव्यापी बंद मागे घ्यायला लावला; मात्र वाढीव मानधन सोडाच नियमित मानधनही वेळेवर नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यात एका अंगणवाडीताईने आत्महत्या केली. दिवाळी भाऊबीज 1 हजाराची 2 हजार केल्याचे जाहीर केले; पण दिवाळी गेली, संक्रांत आली तेव्हा कुठे अर्धी भाऊबीज मिळाली. अशी अर्धी भाऊबीज देणारा मुख्यमंत्री भाऊ नकोच, अशी वेदना गुरुवारी (दि. 17) अंगणवाडीताईंनी प्रगट केली. 

बंदच्या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने विभागीय महिला व बाल विकास उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.  योजना कर्मचार्‍यांच्या देशव्यापी बंदनिमित्त मोर्चाच्या समारोप सभेत त्या आपली व्यथा मांडत होत्या. यावेळी अंगणवाडी कर्मचारी सभेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पवार म्हणाले, आज देशभरातील अंगणवाडी, आशा, माध्यान्ह भोजन आदी लाखो योजना कर्मचार्‍यांनी बंद पाळला आहे.

मानधनाऐवजी वेतन, कायम कर्मचार्‍यांचा दर्जा, विमा, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी, पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा  योजना या कर्मचार्‍यांना लागू कराव्यात, या बंदच्या मागण्या आहेत. अंगणवाडीताईंना राज्यव्यापी बंद मागे घेताना सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही. याविषयी नागपूर हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळ निर्णय झाला, असे एकीकडे सांगितले जाते; मात्र त्याचा सभावृत्तांत अजून तयार नसल्याचे शासनाच्या वेबसाईटवर समजते.

ऑक्टोबरमध्ये झालेला राज्यव्यापी अंगणवाडी बंद मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मागे घेण्यात आला. त्यावेळी जाहीर केलेली मानधन व दिवाळीची वाढीव भाऊबीजही अद्याप मिळालेली नाही.  दोन्ही आश्वासनांची त्वरित पूर्तता झाली नाही, तर पुन्हा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला आहे. या वेळी उपायुक्तालयातील अधिकारी स्मिता भिलारे यांना आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. पिंपरी-चिंचवड शहरातील 182 अंगणवाड्या बंद ठेवून अंगणवाडी ताईंनी या आंदोंलनात सहभाग नोंदविला.