Fri, Jul 19, 2019 22:02होमपेज › Pune › अन् जाग्या झाल्या नोटबंदीच्या आठवणी 

अन् जाग्या झाल्या नोटबंदीच्या आठवणी 

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 21 2018 11:40PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची केलेली घोषणा, रिझर्व र्बँकेकडून रोज निघणार्‍या नवीन फतव्यांमुळे बँकेतील पैसे मिळण्याबाबत ग्राहकांना वाटू लागलेली अनिश्‍चितता... पहाटे साडेपाच पासूनच बँकेच्या दारात उभे राहण्याची आलेली वेळ .. ग्राहक व बँक कर्मचारी यांच्यात उडत असलेले खटके ,तणावामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आरोग्यावर झालेला परिणाम,पिंपरी टाऊन शाखेच्या उपव्यवस्थापकांचा हृदय विकाराने झालेला मृत्यू या सर्व कटू आठवणी नुकत्याच जागल्या. निमित्त होते नोटबंदीच्या काळात सक्षमपणे आपली भूमिका वाटविलेले बँकेचे  सुरक्षारक्षक रमेश कदम यांच्या सेवानिवृत्तीचे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केल्यापासून बँकांमध्ये या नोटा बदलून घेण्यासाठी, नोटांचा भरणा करण्यासाठी मोठ्या रांगा लागू लागल्या .या परिस्थितीला तोंड देण्यासाठी बँकांना तयारीसाठी वेळही मिळाला नाही. ग्राहकांची गर्दी ,अपुरे मनुष्यबळ ,नेहमीपेक्षा कामाचे वेगळे स्वरूप यामुळे कर्मचार्‍यांवरील कामाचा भार वाढला होता.चारच हजार रुपये काढता येतील, दोनच हजार काढता येतील, पुन्हा पुन्हा पैसे काढू नये म्हणून बोटाला शाई, विवाहासाठी अडीच लाख रुपये तेही पूर्वीच्या शिलकीतूनच या फतव्यांमुळे  ग्राहक संतप्त होत चालला होता.

पेंशन, पगारही काढता येत नसल्याने कफल्लक झालेला हा ग्राहक मिळतील तेवढे पैसे पदरात पाडून घेण्यासाठी सकाळी साडे पाचपासूनच बँकेच्या दारात उभा होता. स्टेट बँक पिंपरी टाऊन शाखेतील रांगही कमी व्हायला तयार नव्हती. नोटा बदलण्यासाठी बँकेत गर्दी झाली तेव्हा नोटा तपासणी,नोंद करणे, ओळखपत्र तपासणे या प्रक्रियेसाठी वेळ लागायचा. ग्राहक व कर्मचार्‍यांमध्ये खटके उडायचे. कामाच्या ताणामुळे स्टेट बँकेच्या राजगुरूनगर शाखेतील तुकाराम तनपुरे व त्या पाठोपाठ स्टेट बँकेच्या पिंपरी टाऊन शाखेचे उपव्यवस्थापक प्रवीण सूर्यवंशी यांचे हृदय विकाराने निधन झाले.

त्यामुळे बँक कर्मचार्‍यांनी व अधिकार्‍यांनी नोटबंदीचा चांगलाच धसका घेतला. त्यावेळी भारतीय लष्करात हवालदार म्हणून काम केलेले बँकेचे सुरक्षारक्षक रमेश कदम (सार्वजनिक काका) यांनी कधी आदबीने तर कधी लष्कराचा दरारा दाखवत किल्ला सांभाळला.स्वतः तोफेच्या तोंडी जाऊन बँक अधिकारी व ग्राहक यांच्यातील जणू दुवा म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. स्टेट बँकेच्या मुंबई परळ,पुणे मेन ब्रांच ,कलासागर शाखा अशा अनेक शाखांमध्ये सेवा करून पिंपरी टाऊन शाखेतून ते नुकतेच सेवानिवृत्त झाले यावेळी अनेक बँक ग्राहकांचे डोळे पाणावले .रमेश कदम ‘पुढारी’शी बोलताना म्हणाले, प्रत्येकाने आपले कर्तव्य  प्रामाणिकपणे निभावली तर देश निश्‍चित महासत्ता होईल.