Sun, Jul 21, 2019 00:14होमपेज › Pune › पिंगोरीत नोव्हेंबरमध्ये भरणार घुबड जत्रा

पिंगोरीत नोव्हेंबरमध्ये भरणार घुबड जत्रा

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 1:54AMवाल्हे : प्रकाश पवार 

घुबडांचे मानवाशी नाते व त्यावर नाहक लादलेल्या अंधश्रद्धा यामुळे गैरसमज होतात. हे गैरसमज दूर होऊन घुबड हा मानवाचा मित्र आहे, हे समजाविण्यासाठी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे नोव्हेंबरमध्ये घुबडांची जत्रा भरणार आहे. दि. 29 व 30 नोंव्हेबरला ही जत्रा भरणार असून, नुकतेच या जत्रेचे नियोजन सुरू असल्याची माहिती इला फाउंडेशनचे मुख्य व पक्षिमित्र डॉ. सतीश पांडे यांनी दिली. 

जगात अनेक पक्षी आहेत, मात्र घुबड हा शेतकर्‍यांचा मित्र आहे, याची माहिती जनतेला होणे गरजेचे आहे व त्याचे जतनही झाले पाहिजे. त्याचप्रमाणे समाजातील हे घुबड मित्र असल्याचा संदेश पोहोचण्यासाठी किर्लोस्कर फाउंडेशनही यात सहभागी होत आहे. प्रामुख्याने हे प्रायोगिक तत्त्वावर आहे. काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय घुबड परिषद घेतली जाणार आहे, त्यामध्ये 42 देश सहभागी होतील. परदेशात चार ते पाच वर्षांनी परिषद भरत असते. तेथे त्याचे संरक्षण व जतन हा विषय अभ्यासातून व्यक्त केला जातो. देशात 40 प्रकाचे घुबड आहेत. त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. नऊ प्रजाती अशा आहेत, ज्या फक्त भारताव्यतिरिक्त अन्यत्र दिसत नाहीत. त्यामुळे घुबड हे भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यात बसते. पुढील वर्षी मोठी  परिषद भरणार आहे, पण त्याची पूर्वतयारी म्हणून ही जत्रा भरणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रबोधनासाठी पाऊल

घुबड हा मित्र आहे, हेच मोठे प्रबोधन महत्त्वाचे असून, त्याविषयी असलेल्या अंधश्रद्धा ग्रामीणसह शहरी भागातूनही दूर व्हाव्यात, ही काळाची गरज आहे. दगड झेलणे, गाडीला आडवे जाणे, दिसणे यावर प्रकाशझोत टाकून तो पक्षी मानवाचा मित्र आहे, हे यातून सिद्ध होणार आहे, असे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

निसर्गाचे अभ्याससूत्र दर्शविणार

या घुबड जत्रेत अभ्यासपूर्ण माहिती, चित्रफिती काही प्रमाणावर पक्षी व त्यांचे जीवन उलगडण्याचा प्रकार होणार आहे. काही दुर्मीळ असे घुबडांचे नाणे, नोटांवरील चित्रे तसेच प्रत्यक्ष चित्रफितीद्वारे प्रवक्ते येथे माहितीही सादर करणार आहेत. यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी राहणार आहेत. ही जत्रा निसर्गाचे अभ्याससूत्रच दर्शविणार असल्याने अनेक विद्यालये जत्रेत गाणी, रांगोळी, चित्रे यांसह विविध विषय घेऊन सहभागी होणार आहेत. - डॉ. सतीश पांडे, इला फाउंडेशन