Wed, Mar 27, 2019 04:40होमपेज › Pune › तिघींशी घरोबा करणारा पोलिस निलंबित

तिघींशी घरोबा करणारा पोलिस निलंबित

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी

पुणे शहर पोलिस दलातील एका कर्मचार्‍याने तीन लग्न केल्याचे समोर आले आहेत. पोलिस खात्याची प्रतिमा मलीन केली. तसेच बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी शनिवारी निलंबनाची कारवाई केली.

विजय लक्ष्मण जाधव (28) असे निलंबित केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. जाधव हे सध्या स्वारगेट पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. जाधव यांचा पहिला विवाह झालेला आहे. मात्र, त्यानंतरही त्यांनी गुपचूपणे पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून 24 डिसेंबर 2016 रोजी दुसरा विवाह केला. मात्र, पहिल्या विवाहाची माहिती दुसर्‍या पत्नीला झाली. पहिल्या लग्नाचे प्रकरण बारामती कोर्टात सुरू असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्यावर वाद सुरू झाले. त्यानंतर जाधव यांनी दुसर्‍या पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करून गर्भपातदेखील केला. शेवटी जाधव यांच्या त्रासाला कंटाळून दुसरी पत्नी माहेरी निघून गेली. यानंतरदेखील जाधव यांनी 20 डिसेंबर 2017 रोजी खेड तालुक्यातील एका मुलीशी तिसरा विवाह केला. विवाहासाठी त्यांनी 50 हजार रुपये घेतले. जाधव यांनी तिसर्‍या पत्नीला पहिल्या लग्नांबाबत काहीही सांगितले नाही. काही दिवसांनी मात्र, तिसर्‍या पत्नीलादेखील जाधव यांची पहिले दोन विवाह झाल्याची माहिती मिळाली.  

तिसर्‍या विवाहाची माहिती मिळताच दुसर्‍या पत्नीने आपली फसवणूक झाल्याप्रकरणी पती, सासरे, दीर यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात 11 एप्रिल 2018 रोजी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जाधव यांच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त यांनी त्यांची चौकशी केली. जाधव यांनी पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन करणारे बेजबादार, बेशिस्त असे निष्काळजीपणाचे गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच, शनिवारी रात्री पोलिस उपायुक्त डॉ. मुंढे यांनी जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. निलंबन कालावधीमध्ये पोलिस उपायुक्त झोन दोनच्या कार्यालयात दररोज हजेरी लावल्याचे आदेश दिले आहेत.