Thu, Jun 27, 2019 12:35होमपेज › Pune › अतिक्रमणविरोधी पथकावर हल्ला

अतिक्रमणविरोधी पथकावर हल्ला

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील रस्त्यावर वर्षानुवर्षे पडून असलेली वाहने उचलण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर शुक्रवारी (दि. 19) मध्यरात्री भवानीपेठ परिसरात हल्ला झाला. 

रस्त्यावरील गाड्या जप्त करू नयेत यासाठी एका टोळक्याने पथकातील कर्मचार्‍यांवर दगडफेक करीत क्रेन चालकाला मारहाण केली.शहरातील रस्त्यांवर बंद अवस्थेतील अनेक वाहने वर्षानुवर्षे धूळखात पडून आहेत. या वाहनांमुळे शहराच्या वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडत आहे. महापालिकेकडून 1 जानेवारी 2018 पासून शहरात पथ विक्रेता धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

या धोरणानुसार रस्त्यावरील  वाहने जप्त करून त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, गेल्या तीन आठवड्यांत जवळपास 376 वाहने अतिक्रमण विभागाने जप्त केली आहेत. ही कारवाई प्रामुख्याने रात्री नऊ नंतर करण्यात येते. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्री भवानी पेठेत अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईसाठी गेले असताना या भागातील नागरिकांच्या रोषास या पथकाला सामोरे जावे लागले. 

येथील नागरिकांच्या एका टोळक्याने पालिकेच्या काही कर्मचार्‍यांना मारहाणी केली, तसेच क्रेन आणि काही गाड्यांची तोडफोड केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मात्र, या प्रकारानंतर या कारवाईसाठी वापरण्यात येणार्‍या क्रेन चालकांनी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली. तसेच या प्रकारानंतर कारवाई थांबविण्यात आलेली नसून ती अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.