Mon, Apr 22, 2019 15:50होमपेज › Pune › सामान्यांचे हित जोपासणारा प्रतिनिधी

सामान्यांचे हित जोपासणारा प्रतिनिधी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांचा शिक्षण, क्रीडा, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील वारसा अशोक मोहोळ यांनी जोपासला आहे. आमदार आणि खासदार म्हणूनही त्यांनी उत्तम प्रतिनिधित्व केले आहे. सत्तेच्या जवळ जाऊनही सर्वसामान्य माणसाचे हित जोपासण्याचे काम त्यांनी केल्याचे गौरवोद‍्गार माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. 

माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी पवार यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, संजय काकडे, माजी मंत्री पंतगराव कदम, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, माजी आमदार बाळा नांदगावकर, अमृतमहोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष नानासाहेब नवले आदी उपस्थित होते. या वेळी अशोक मोहोळ यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी पवार म्हणाले, पुणे जिल्ह्याच्या राजकीय नेतृत्वामध्ये ज्या मंडळींची नावे घेतली जातात त्यामध्ये मामासाहेब मोहोळ यांचे नाव कटाक्षाने घेतले पाहिजे. त्यांनी रोवलेली मुहूर्तमेढ अशोक मोहोळ व त्यांच्या कुटुंबीयांनी वाढविली आहे. सामान्य व्यक्तीला प्रतिष्ठा आणि सन्मान मिळावा म्हणून मोहोळ कुटुंबीय सतत झटत राहिलेले. मोहोळ यांनी सुरुवातीस क्रिकेटमध्ये कर्तृत्व गाजविले असल्याचेही ते म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना अशोक मोहोळ म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनामध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा असून, विदुरा नवले, अनंतराव थोपटे यांनीही मोलाची साथ दिली. आई-वडिलांचे संस्कार, पत्नीची साथ आणि कार्यकर्त्यांची सर्वतोपरी मदत यामुळे माझी जडणघडण झाली असून, अमृतमहोत्सवानिमित्त होणारा सत्कार हा सर्व कार्यकर्त्यांचा आहे. जे काही काम माझ्याकडे आले ते उत्तम प्रकारे पार पाडल्याचे आज मला समाधान आहे. 

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, राजकारणापलीकडे जाऊन मोहोळ कुटुंबीयांनी पुण्यासह राज्यात चांगला वारसा जोपासला आहे. लोकांनी त्यांना सहजतेने मान्यता दिल्याने सहकार आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी खेडोपाडी चांगले काम केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर दलीप बराटे यांनी आभार मानले.