Wed, Apr 24, 2019 01:42होमपेज › Pune › रुग्णवाहिका आरोग्य केंद्राच्या आडोशाला!

रुग्णवाहिका आरोग्य केंद्राच्या आडोशाला!

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:27AMपुणे : नवनाथ शिंदे

जिल्ह्यातील गावे, वाड्या-वस्त्यांवरील गर्भवती व नवजात बालकांना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणार्‍या चालकांनी पगार थकल्यामुळे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील रुग्णवाहिकेतून रुग्णांची ने-आण बंद झाली आहे. रुग्णवाहिका चालकांनी मागील पाच दिवसांपासून सुरू केलेल्या कामबंद आंदोलनावर प्रशासन व पदाधिकार्‍यांनी अद्यापही तोडगा काढला नाही. त्यामुळे शेकडो गर्भवती तसेच नवजात बालके, अपघातग्रस्त रुग्ण वेळेत रुग्णालयात न पोहचल्यामुळे त्यांची परवड सुरू आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या रुग्णवाहिका चालकांचे पगार ठेकेदारांकडून पाच महिन्यांपासून रखडवण्यात आले आहेत. परिणामी चालकांच्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामीण भागात 102 क्रमांकावरून उपलब्ध होणार्‍या रुग्णवाहिकांचा सायरन बंद झाला आहे. जिल्ह्यातील 96 प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेवर 20 चालक शासकीय सेवेत कार्यरत आहेत. उर्वरित 76 चालकांना ठेकेदार पद्धतीनुसार वेतन दिले जाते. दरम्यान, एका रुग्णवाहिकेद्वारे दिवसाला दोन ते तीन रुग्णांची ने आण केली जाते. 76 रुग्णवाहिका बंद ठेवल्यामुळे पाच दिवसांत हजारांवर रुग्णांची परवड झाली आहे. ठेकेदाराने कंत्राटी वाहन चालकांचा नोव्हेंबर 2017 पासून पगार दिला नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास रुग्णांची  ने-आण करणार्‍या चालकांच्या कुटुंबावरच उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कंत्राटी वाहनचालक संघटनांनी शुक्रवारपासून (दि. 13) कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून चालकांना सोमवारपर्यंत (दि. 16) पगार जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, प्रशासनाच्या पोकळ आश्‍वासनामुळे आणि पगार जमा न झाल्यामुळे कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने चालकांच्या पगाराबद्दल ठेकेदार आणि रुग्णवाहिका संघटनांनी बघून घ्यावे, अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिल्याचा आरोप कंत्राटी वाहनचालक संघटनांनी केला आहे.

रुग्णांना वेळेत आणि मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी शासनाकडून 102 क्रमांकाचा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांनी फोन केल्यानंतर कंट्रोल रूममधून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकांना रुग्णांची माहिती दिली जाते. त्यानंतर चालकांकडून संबंधित ठिकाणी तत्काळ रुग्णवाहिका नेऊन रुग्णांना जिल्हा अथवा उपजिल्हा रुग्णालयात पोहचविले जात आहे.  रात्री-अपरात्री वाड्या-वस्त्यांवरील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचविण्यासाठी तत्पर असणार्‍या चालकांना वेळेत पगार न देणार्‍या ठेकेदाराचे लाड कोण पुरवत आहे, असा सवाल रुग्णवाहिका चालकांनी केला आहे. तसेच प्रशासनाकडून रुग्णवाहिका चालकांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी हाताची घडी तोंडावर बोट असल्याची संशयास्पद भूमिका ठेकेदाराला फायदेशीर असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. 

Tags : Pune, Ambulance, Health, Center