Wed, Jul 24, 2019 13:01होमपेज › Pune › आंबेडकर वस्तूसंग्रहालयाकडे दुर्लक्ष

आंबेडकर वस्तूसंग्रहालयाकडे दुर्लक्ष

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 1:08AMपुणे : हिरा सरवदे 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमधील ‘आंबेडकर वस्तू संग्रहालया’मध्ये पुरातन आणि धातूंच्या बुद्धमूर्त्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील छायाचित्र, दुर्मिळ वस्तू, महार रेजीमेंटने वापरलेले पोषाख, वस्तू आदींचा समावेश आहे. मात्र या संग्रहालयाकडे महापालिका आणि नागरिकांनीही दुर्लक्ष केल्याने या वस्तू धुळखात पडल्या आहे. महापालिकेने या संग्रहालयास भेट देणारी पुणे दर्शन ही बसही बंद केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आणि शहराचे कारभारी या संग्रहालयास कशी दुजाभावाची वागणुक देत आहेत, हे दिसून येते.  

स्टेशन परिसरातील मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येते ‘आंबेडकर वस्तू संग्रहालय’ आहे. या संग्रहालयाचा एक भाग सुभेदार धर्माजी खांबे यांच्या स्मरणार्थ सुधाकर खांबे यांच्याकडील विविध लष्करी वस्तूंचा आणि दुसरा भाग दिलीप वानखेडे यांच्याकडील विविध पुरातन बुद्धमूर्त्या व दुर्मिळ वस्तूंचा आहे. सुधाकर खांबे यांनी वेगवेगळ्या व्यक्तींना भेटून लष्करातील वस्तू मिळविल्या, त्या वस्तू या विभागातात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये महार रेजिमेंटमधील विविध जवानांचे फोटो, त्यांचे पोषाख, जवावांना मिळालेली पदके, रिझिमेंटची छायाचित्रे अशा वस्तूंचा समावेश आहे. 

संग्रहालयाच्या दुसर्‍या भागात रमाबाई आंबेडकर यांनी वापरलेले जाते, चुल, गोवर्‍या, भाकरी करण्याची काटवट, मातीची मडकी आदींचा समावेश आहे. दिलीप वानखेडे यांनी नोकरी करत असताना मिळविलेल्या बुध्द मुर्त्यां येथे ठेवण्यात आल्या आहेत.  महापालिकेने 2000 रोजी खांबे आणि वानखेडे यांच्याशी करार करून त्यांच्याकडील दुर्मिळ आणि पुरातन वस्तू या संग्रहालयात ठेवल्या. या बदल्यात पालिकेकडून त्यांना दरमहा 4 हजार रुपये दिले जात होते. करार संपल्यानंतर मार्च 2016 पासून आजपर्यंत पालिकेने खांबे आणि वाखेडे यांच्यासोबत करार केला नाही. त्यामुळे गेली दोनवर्षापासून त्यांना मानधन देण्यात आले नाही. पालिका प्रशासन जाणून बुजून या संग्रहालयाकडे दुर्लक्ष करत असल्याने पुरातन बुद्ध मूर्त्यां आणि दुर्मिळ वस्तू धुळीच्या साम्राज्यात अडकल्या आहेत.