Sat, Jul 20, 2019 02:11होमपेज › Pune › रात्रशाळेत शिक्षकांच्या भरतीची परवानगी द्यावी

रात्रशाळेत शिक्षकांच्या भरतीची परवानगी द्यावी

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:17AMपुणे : प्रतिनिधी

राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येणार आहे. परंतु, शिक्षकांअभावी रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यातच रात्रशाळेतील शिक्षकांची पदे अंशकालिक आहेत व त्यांना सेवा संरक्षण लागू केलेले नाही. त्यामुळे शिक्षक भरतीची परवानगी देण्यात यावी, असे पत्र राज्याचे शिक्षण आयुक्‍त डॉ. विपीन शर्मा यांनी प्रधान सचिव नंदकुमार यांना दिले आहे.

पूना नाईट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट कॉलेज, हिंद सेवा मंडळ अहमदनगर यांचे सथ्था नाईट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांनी शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी रिक्त झालेल्या पदावर शिक्षक नियुक्तीसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे. उपसंचालकांनी या शाळांमध्ये तीन शिक्षकांचे समायोजन केले आहे. परंतु, संबंधित रात्र शाळांनी रिक्‍त पदे भरण्यास परवानगीची मागणी केली.

वित्त विभागाचा निर्णय 30 जून 2017 तसेच 8 ऑगस्ट 2017 नुसार शासन मान्यतेशिवाय भरती करू नये. क्षेत्रीय अधिकार्‍यांनी देखील पदांना मान्यता देऊ नये, अशा सूचना आहेत. परंतु, रात्र शाळेतील शिक्षकांची पदे अंशकालिक असून, त्यांना सेवा संरक्षण लागू केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक भरतीस परवानगी देता येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक, उपसंचालक यांनी कळवले आहे.