होमपेज › Pune › आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून नियमबाह्य पदव्यांचे वाटप

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून नियमबाह्य पदव्यांचे वाटप

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:15AMपुणे : गणेश खळदकर 

विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या कोणत्याही पदवीचे नाव जर विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीच्या यादीमध्ये नसेल तर अशा पदव्या या नियमबाह्य मानल्या जातात. तरीदेखील नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे यूजीसीच्या यादीमध्ये नसलेल्या बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी आणि बॅचलर इन ऑडिओलॉजी अ‍ॅण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी या विद्याशाखांंतर्गत येणार्‍या तब्बल एकवीस अभ्यासक्रमांच्या पदव्या या नियमबाह्य दिल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

परावैद्यक क्षेत्रात मनुष्यबळाचा अपुरा पुरवठा लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र परावैद्यक परिषद अधिनियम 2011 ची निर्मिती केली. त्या अनुषंगाने विविध अभ्यासक्रमांची निर्मितीदेखील करण्यात आली. परावैद्यक क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रम राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये सुरूदेखील झाले. हे अभ्यासक्रम बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी (बी.पी.एम.टी.) या विद्याशाखेअंतर्गत परावैद्यक तंत्रज्ञान पदवी- प्रयोगशाळा तंत्रज्ञ, किरणोत्सार तंत्रज्ञ, किरणोपचार तंत्रज्ञ, हृदयचिकित्सा तंत्रज्ञ, मज्जातंतूशास्त्र तंत्रज्ञ असे विविध 21 अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु, हे अभ्यासक्रम राबवत असताना ते विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यादीमध्येच नसल्याचे उघड झाले असून, त्यामुळे विद्यापीठ देत असलेल्या पदव्या या नियमबाह्य असल्याचे सिद्ध होत आहे. 

राज्य शासनाने परावैद्यक परिषदेची निर्मिती केली असली तरी या परिषदेकडून विद्यार्थ्यांची नोंदणीदेखील अद्याप सुरू झाली नसल्याचे उघडकीस आले आहे, तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिकार्‍यांमध्ये परिषदेच्या कामकाजावरून संभ्रम असल्याचे अधिकार्‍यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.

यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी विद्यापीठाकडून यूजीसीच्या यादीमध्ये नसणार्‍या अभ्यासक्रमांच्या नावाने पदव्या देत असल्याचे मान्य करत शासनाने गेल्या वर्षापासून अभ्यासक्रमाचे नॉर्म अ‍ॅण्ड क्‍लेचर बदलले असल्याची माहिती दिली. 

यासंदर्भातील अध्यादेश तसेच सुधारित परिपत्रक देखील काढल्याचे सांगितले. तसेच आता बीपीएमटीऐवजी बीएस्सी इन संबंधित अभ्यासक्रम या नावाने पदवी देत असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पदव्यांवर बी.पी.एम.टी. असा उल्लेख असेल आणि ज्यांना नवीन नावाने पदवी हवी असेल त्यांनी एक वर्षाची इंटर्नशिप करावी जुनी ओरिजनल पदवी जमा करावी आणि नवीन घेऊन जावी, असा अजब खुलासा केला आहे. तर विद्यापीठाच्या कुलसचिवांनी जरी अभ्यासक्रमाचे नॉर्म अ‍ॅण्ड क्‍लेचर बदलले असल्याचे सांगितले असले तरी अद्याप देखील विविध महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर जुन्याच नावाचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.