Sun, May 26, 2019 21:48होमपेज › Pune › सत्ताधारी व शिक्षण विभागास शिक्षक दिनाचा विसर

सत्ताधारी व शिक्षण विभागास शिक्षक दिनाचा विसर

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 05 2018 1:53AMपिंपरी : प्रतिनिधी 

देशभरात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्ताधारी भाजप आणि शिक्षण विभागास या दिनाचा विसर पडला असून, या निमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केले गेले नाही. हा प्रकार शिक्षकांचा अपमान करणार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मंगळवारी (दि.4) केला आहे. विरोधी पक्षनेते दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला शिक्षण समितीचे सदस्य राजू बनसोडे, विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर आदी उपस्थित होते. 

साने म्हणाले की, शिष्य व गुरू हे नाते अधिक प्रगल्भ होण्यासाठी व वर्षभर केलेल्या ज्ञानदानाची उतराई होण्यासाठी शिक्षकांचे कौतुक म्हणून हा दिवशी शिक्षक दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. वर्षभर ज्या शिक्षकांनी वर्षभर मेहनत घेऊन विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षकवृंद करीत असतो. हा दिन पालिकेतील प्राथमिक व माध्यमिक शाळेतसुध्दा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गुणवंत शिक्षकांना या दिवशी सन्मानित केले जाते. तसेच आदर्श शाळेचासुध्दा सत्कार केला जातो.

परंतु, शिक्षक दिन उद्या बुधवारी (दि.5) असूनही पालिकेतील माध्यमिक व शिक्षण विभागामार्फत कोणत्याच प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे परपंरने साजरा होणार्‍या शिक्षक दिन माध्यमिक व शिक्षण विभागातील जबाबदार अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षक दिन साजरा होणार नाही. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडला आहे. यामध्ये भाजपचे पदाधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. गेल्या वर्षीही शिक्षण दिनाला गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त हुकला होता, असा आरोप साने यांनी केला आहे. 

या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने निषेध केला आहे. शिक्षक दिन साजरा न करणार्‍या संबधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साने यांनी केली आहे. या संदर्भात शिक्षण विभागाच्या ज्योत्स्ना शिंदे व सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांना साने यांनी धारेवर धरले. या प्रकारास शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे या ही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तर, दुसरीकडे शिक्षण दिनासाठी 5 लाख खर्चाला ऐनवेळी मान्यता देण्याचा घाई केली गेल्याचा आरोप त्यांनी केला.