Sat, Jul 20, 2019 15:03होमपेज › Pune › वारीतही नारी ‘भारी’!

वारीतही नारी ‘भारी’!

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:36AMपुणे : प्रतिनिधी 

महिला ग्रामीण भागातील असो किंवा शहरी, गृहिणी असो वा नोकरदार, आयटी क्षेत्रातील असो की, कष्टकरी असो, सर्वच स्तरातील महिलांचा पालखीत सहभाग पाहायला मिळाला. भर पावसात डोक्यावर पितळी तुळशी वृंदावन घेऊन टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन होत महिला पालख्यांसोबत पंढरपूरच्या वाटेला लागल्या आहेत.  दररोजची जगण्यातील धावपळ आणि प्रपंचातील नाना चिंता विसरून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालख्यांमध्ये  सहभागी झालेल्या महिलांंच्या ओठी फक्त विठुरायाचे नाम आहे. अखंड विठ्ठल नामाचा गजर करत भक्तिरसात चिंब होणार्‍या माता-भगिनी पाहून भक्तीच्या अपूर्व आनंदाची अनुभूती झाल्याशिवाय राहात नाही.

कोणाला माउलींच्या भेटीची आस, तर कोणी घराण्याची परंपरा म्हणून या वारीत दरवर्षी आवर्जून सहभागी झाले आहेत.  प्रत्यक्ष वारीत सहभाग घेतलेल्या महिलांची संख्या लक्षणीय असते. याशिवाय अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे वारकरी आणि भक्तांची सेवा करण्यासाठीही महिला पुढे असल्याचे शनिवारी पुण्यात पालखी दाखल झाल्यानंतर दिसून आले. पुण्यात मुक्कामी असलेल्या दिंडीतील वारकर्‍यांसाठी जेवण बनविण्यापासून ते त्यांची आरोग्य तपासणी करण्यापर्यंतच्या प्रत्येक उपक्रमात महिलांचा हिरिरीने सहभाग पाहायला मिळाला. भाविक महिलांसोबतच महिला पोलिस कर्मचारी, दिंडीतील वारकर्‍यांना आरोग्य सुविधा पोहोचवणार्‍या महिला डॅाक्टरांनीही आपले कर्तव्य चोख बजावले.