Tue, Sep 25, 2018 10:35



होमपेज › Pune ›  पुणे स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्म आता ६१० मीटरचे 

 पुणे स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्म आता ६१० मीटरचे 

Published On: Jan 09 2018 4:12PM | Last Updated: Jan 09 2018 4:12PM

बुकमार्क करा




पुणे: प्रतिनिधी 

 पुणे रेल्वे स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्म आता 610 मीटर लांबीचे करण्यात येणार आहेत. सध्या केवळ प्लॅटफॉर्म एक हाच  610 मीटर लांबीचा असून, त्यावर 26 कोचच्या रेल्वे मावू शकतात. प्लॅटफॉर्म दोन हा 510 मीटर लांबीचा आहे त्यावर 22 कोच, प्लॅटफॉर्म तीन हा  555 मीटर लांबीचा असून त्यावर 23 कोच, प्लॅटफॉर्म चार 445 मीटर लांबीचा आहे त्‍यावर 19 कोच, प्लॅटफॉर्म पाच 445 मीटर लांबीचा असून,  त्यावर 19 कोच आणि प्लॅटफॉर्म सहा 512 मीटर लांबीचा असून त्यावर 22 कोचच्या रेल्वे थांबू शकतात. मात्र, आता प्लॅटफॉर्म 2 ते 6 पर्यंतच्या प्लॅटफॉर्मची लांबी देखील वाढणार आहेत त्‍यावर 26 कोचच्या रेल्वे येथे थांबू शकतील. 

या करिता रेल्वे बोर्डाकडून 50 कोटी रुपये मंजूर झाले असून, लांबी वाढविण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. मार्च 2019 पर्यंत हे काम पुर्णत्‍वास येणार असल्याची माहिती देण्यात आली. सर्व प्लॅटफॉर्मची लांबी वाढविल्यानंतर रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात येतील, तसेच नव्या रेल्वे देखील सुरू करता येतील, अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दै. पुढारीशी बोलताना दिली आहे. पुणे स्थानकावरून सध्या 220 रेल्वे ये-जा करतात. दीड लाख प्रवासी दररोज पुणे स्थानकावरून जातात. मात्र वर्दळीच्या पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एक खेरीज अन्य प्लॅटफॉर्मची लांबी अधिक नसल्याने अनेक लांब पल्ल्यांच्या  गाड्या ज्या 26 कोचच्या आहेत, त्यांना लाल सिग्नल दिला जातो व आउटरला थांबविले जाते. प्लॅटफॉर्म एक रिकामा झाल्यानंतरच त्या गाड्यांना हिरवा सिग्नल मिळतो. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो व त्‍यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप होतो. आता मात्र हे चित्र बदलणार असून, प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. 

दरम्यान, पुणे यार्ड रिमॉडेलिंगचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिली आहे. पुणे यार्डात डायमंड क्रॉसिंग असल्याने तेथून गाडी जात असताना ताशी 10 ते 15 किलोमीटर वेग राखावा लागतो. रिमॉडेलिंगनंतर ही समस्या सोडविली जाणार असून, यार्डातून पुढे जाणाऱ्या रेल्वेचा वेगही वाढणार आहे. पुणे स्थानकावर सध्या मालगाडी मावू शकत नाही त्‍यामुळे तिला शिवाजीनगर स्थानकात पाठविले जाते. यार्ड रिमॉडेलिंगनंतर तिला यार्डात किंवा पुणे स्थानकावर थांबविता येऊ शकेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या 26 कोचच्या करण्यात आल्याने 17 कोचच्या प्रतिष्ठित डेक्कन क्वीनला प्लॅटफॉर्म पाचवरून गेले वर्षभर सोडण्यात येत आहे. प्लॅटफॉर्मची लांबी वाढविल्यानंतर डेक्कन क्वीन पुन्हा प्लॅटफॉर्म एकवरून पूर्वीसारखी सोडण्यात यावी, अन्यथा रुळांवर उतरून तीव्र आंदोलन करू, अशी संतप्त प्रतिक्रिया एका प्रवाशाने दै. पुढारीशी बोलताना व्यक्त केली आहे.