Mon, Aug 19, 2019 11:06होमपेज › Pune › दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र यावे : मेजर जनरल संजीव शर्मा 

दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र यावे : मेजर जनरल संजीव शर्मा 

Published On: Sep 11 2018 1:40AM | Last Updated: Sep 11 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी 

दहशतवाद ही समस्या केवळ एका राष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नसून जगातील बहुतांश देशांना दहशतवादाचा सामना करण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. या समस्येशी लढण्याकरिता व दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत लष्कराच्या गोल्डन कतार तुकडीचे प्रमुख मेजर जनरल संजीव शर्मा यांनी सोमवारी व्यक्त केले. 

बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टोरल टेक्नोलॉजिकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक को-ऑपरेशन(बिम्सटेक) सदस्य राष्ट्रांच्या ‘मिलेक्स’ या पहिल्या संयुक्त लष्करी सरावाचा सोमवारी औपचारिक संचलनाद्वारे प्रारंभ झाला. या वेळी मेजर जनरल शर्मा बोलत होते. मेजर जनरल शर्मा पुढे बोलताना म्हणाले, अशाप्रकारचा संयुक्त लष्करी सराव हे सैन्यातील परस्पर सामंजस्य आणि युद्धकौशल्य वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भविष्यात नक्कीच या लष्करी सरावाचा फायदा होईल, असा मला विश्‍वास वाटतो. सदस्य राष्ट्रांच्या लष्करी तुकड्यांचा सहभाग असलेल्या संचलनाचे नेतृत्व या वेळी गोरखा बटालियनचे कॅप्टन गौरव शर्मा यांनी केले. 

बिम्सटेक सदस्य राष्ट्रांच्या पहिल्याच संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन पुण्यातील औंध येथील लष्करी ठाणे येथे करण्यात आले आहे. पुढील सहा दिवस हा सराव होणार असून, रविवार दि. 16 रोजी या सरावाचा समारोप होणार आहे. 

या लष्करी सरावात भूतान, बांगलादेश, म्यानमार, भारत आणि श्रीलंका या राष्ट्रांच्या सैनिकी तुकड्यांचा सहभाग आहे. थायलंडतर्फे एक निरीक्षक तुकडी यामध्ये सहभागी होणार आहे. ही तुकडी प्रत्यक्ष युद्धसराव न करता केवळ निरीक्षक म्हणून काम पाहणार आहे.

लष्करी सरावातून नेपाळची माघार 

बिम्सटेकची स्थापना करताना लष्करी सरावाबाबत कोणताही करार झाला नव्हता, त्यामुळे हा लष्करी सराव हा संघटनेच्या कराराशी सुसंगत नसल्याचे कारण देत नेपाळने या लष्करी सरावात सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नेपाळतर्फे केवळ निरीक्षक तुकडी या सरावात सहभागी होणार आहे. नेपाळच्या या भूमिकेमागे चीनकडून होणारा दबाव हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.