Wed, Nov 14, 2018 23:40होमपेज › Pune › ‘बालगंधर्व’बाबत चर्चेला उधाण

‘बालगंधर्व’बाबत चर्चेला उधाण

Published On: Mar 21 2018 2:10AM | Last Updated: Mar 21 2018 12:38AMप्रसाद जगताप

पुणे : पुणे महानगरपालिका प्रशासनाने बजेटदरम्यान बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी 10 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर शहरात नाट्य, साहित्य, कला क्षेत्रात एकच हलकल्लोळ माजला आणि अफवांना उधाण आले. कोणी म्हणे, इथे गोव्याच्या धर्तीवर कला अकादमी होणार, तर कोणी म्हणे, शॉपिंग मॉल होणार. कोणी तर म्हणे, सध्या शहरात मेट्रोचे काम युध्दपातळीवर सुरू आहे; त्यामुळे मेट्रोच्या पार्किर्ंंगसाठी बालगंधर्व रंगमंदिर परिसर वापरणार, अशा अफवांनी जोर धरल्याने, ज्यांचे पोट या रंगमंदिरावर आहे, अशासामान्य कलावंतांत चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी काय होणार आणि ते कधी होणार, याबाबत मात्र गूढ कायम आहे.

ज्येष्ठ नाटककार पु. ल. देशपांडे यांची संकल्पना आणि अलौकिक प्रतिभेचे संगीत नट बालगंधर्व यांचे नाव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या या प्रश्‍नावर आता नाट्यकर्मी, कर्मचारी आणि साहित्य क्षेत्रात नाराजीचे सूर उमटत आहेत. अनेक कलाकारांकडून बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाऐवजी शहरातील इतर सर्व नाट्यगृहांची निगा राखण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला या वर्षी 8 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली उभेे राहिलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडून, जन्मशताब्दीत पुलंना अभिवादन करणार का, अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेनेदेखील बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या कल्पनेला विरोध केला आहे.

Tags :