Mon, Jun 24, 2019 17:01होमपेज › Pune › पुणे : शोभायात्रेतून शहरवासीयांना लोककलेचे दर्शन

पुणे : शोभायात्रेतून शहरवासीयांना लोककलेचे दर्शन

Published On: Apr 14 2018 2:53PM | Last Updated: Apr 14 2018 2:53PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा व लोकरंग सांस्कृतिक कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलनाची सुरुवात सकाळी शोभायात्रेने करण्यात आली. या शोभायात्रेतून शहरवासीयांना लोककलांचे वैविध्यपूर्ण अविष्कार अनुभवयाला मिळाले. 

चिंचवड येथे हे संमेलन होत असून यानिमित्ताने शहरवासीयांना विविध लोक कलाविष्कारांचा आस्वाद घेता येणार आहे.  समेलनाची सुरुवात शुक्रवारी सकाळी नऊ वाजता चिचंवड येथील मोरया गोसावी समाधी मंदीरापासून ग्रंथदिंडीचे पूजन करुन करण्यात आली.  चिचंवडगावातून निघालेल्या या शोभायात्रेचा समारोप प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आला. या शोभायात्रेत संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर, डॉ प्रकाश खांडगे यांच्यासह लोककलाकार सहभागी झाले होते. 

 यावेळी शोभायात्रेत सनई चौघडा, वासुदेव, कडकलक्ष्मी, पोतराज, शाहीर, कोकणी बालनृत्य, वारकर्‍यांची दिंडी, गोंधळींचा गोंधळ यासह विविध लोककलांचा अभूतपूर्व अविष्कार शहरवासीयांनी अनुभवला. शनिवारपर्यंत हे संमेलन चालणार असून यात विविध कलांचा संगम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रसिकांना मेजवानी मिळणार आहे. 'संमेलन स्थळाला शाहीर पठ्ठे बापूराव नगरी' असे नाव देण्यात आले असून रसिक प्रेक्षक या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी शाहिर पठ्ठे बापूराव नगरीत दाखल होत आहेत.

Tags : akhil bharatiy marathi lokkala sammelan, pune, pune news, folk art,