Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Pune › दारूची जाहिरात पडणार महागात

दारूची जाहिरात पडणार महागात

Published On: Jul 06 2018 1:45AM | Last Updated: Jul 06 2018 1:40AMपुणे : समीर सय्यद

वाईन शॉप, बिअर शॉप आणि बिअर बार विक्रेत्यांना यापुढे दारूच्या ब्रँडची जाहिरातबाजी करण्यास शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे  ठिकठिकाणी लावलेले जाहिरात फलक तातडीने काढून घ्यावेत, अन्यथा  गुन्हा दाखल केला जाईल,  असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्रेत्यांना दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील अनेक दारू विक्रेत्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होण्याच्या भीतीने दुकानासमोरील जाहिरातीचे फलक हटवले असल्याचे चित्र  पाहायला मिळत आहे. 

दारू विक्री करण्यासाठी वाईन शॉप, बिअर शॉप आणि बिअर बारला राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत परवाना दिला जातो. परवाना मिळाल्यानंतर विक्री वाढण्यासाठी दुकान मालक व चालकांकडून विशेषत: उत्सवाच्या काळात दुकान फलकावर व इतर ठिकाणी दर्शनी भागात सेलिब्रिटीजचे फोटो वापरुन दुकानाची जाहिरात केली जाते. मद्य शैकीनांना आकर्षित करणे हा या मागचा हेतू असतो. मात्र, यापुढे दारूची जाहिरात करणार्‍यांविरोधात कडक कारवाईची अंमलबजावणी केली जाणार आहे.   

सध्या सर्वच मद्यविक्री आणि पुरवठा करण्याच्या ठिकाणी सर्रासपणे जाहिराती आढळून येतात. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने शहर, जिल्ह्यातील 250 वाईन शॉप, आणि 508 बिअर शॉपी धारकांना जाहिरातीचे फलक काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फलक न काढणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीकक्षक सुनील फुलपगार यांनी सांगितले. 

फलकावर केवळ दुकानाचे नाव

दुकानाच्या बाहेर लावण्यात येणार्‍या जाहिरात फलकावर कोणत्याही दारूच्या बाटलीचे, एखाद्या स्त्रीचे आणि दारुच्या कंपनीचे नाव लावता येणार नाही. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नाम फलकाच्या बोर्डावर लाईटिंगही करण्यास निर्बंध घातले आहेत.  केवळ दुकानाचे नाव, लायसन्स नाव आणि लायसन्स नंबर इतकेच दुकानाच्या फलकावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.