Thu, Jun 27, 2019 11:47होमपेज › Pune › आळंदीत 8 धर्मशाळा बांधकामांवर हातोडा 

आळंदीत 8 धर्मशाळा बांधकामांवर हातोडा 

Published On: Feb 11 2018 1:35AM | Last Updated: Feb 11 2018 1:08AMआळंदी : वार्ताहर 

आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार विकासकामांना अडथळा ठरणारी बांधकामे, अतिक्रमणे शनिवारी (दि. 10) नगरपरिषद तसेच आळंदी पोलीस स्टेशन यांनी संयुक्‍त कारवाई करीत हटविली. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असलेली कामे अद्यापही तशीच असली तरी बहुतांशी अतिक्रमणे हटविण्यास प्रशासनाला यश आले आहे.  शहरातील पोस्ट ऑफिससमोरील बुरूड समाज धर्मशाळा ही पुरातन इमारत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली. ही महत्त्वाची मानली जात असून यामुळे आळंदीचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतील कामांचा मार्ग आता खर्‍याअर्थी मोकळा झाला आहे. अतिक्रमण कारवाईत आतापर्यंत 8  बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र विकासांतर्गत आळंदीतील विकासकामांचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विविध कामे प्रस्तावित असून यामध्ये रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे, 
जुन्या इमारती, धर्मशाळा यांचा मोठा अडथळा ठरत होता. यामुळे यावर कारवाईचे संकेत यापूर्वीच देण्यात आले होते. त्यानुसार नगरपरिषद प्रशासनाने पूर्व नोटीसाही संबंधीतांना पाठविल्या. नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आणि आळंदी पोलीसांच्या पथकाने शनिवारी (दि. 10) सकाळी 11 वाजता प्रदक्षिणा मार्गावर कारवाईला सुरूवात केली. ज्यांना नोटीसा गेल्या अशा गाळेधारक, दुकानदार, धर्मशाळा मालक व पोटभाडेकरू आदींनी आपापली दुकाने मोकळी करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य केले. अनेक दुकानदारांनी स्वत: जागा खाली करून दिल्या. यामुळे अलंकापुरी मोकळी वाटू लागली असून पुढील विकासकामांना आता वेग येणार आहे. 

यावेळी खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी कारवाईवेळी पाहणी केली. धर्मशाळेत जे भाडेकरू आहेत, त्यांनी स्वत: जागा खाली करून दिल्या. मात्र, काहींनी मात्र या कारवाईत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. प्रशासकीय यंत्रणेनेही ही अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत अतिक्रमण कारवाई यशस्वी केली. ही मोहिम पुढील तीन ते चार दिवस सुरू राहणार असल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले.