होमपेज › Pune › आकुर्डीत ‘ई-पॉस’ मशिनबाबत कार्यशाळा

आकुर्डीत ‘ई-पॉस’ मशिनबाबत कार्यशाळा

Published On: Feb 27 2018 1:58AM | Last Updated: Feb 27 2018 12:49AMपिंपरी : प्रतिनिधी

शिधापत्रिका कार्यालयाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदारांची कार्यशाळा घेण्यात आली. आकुर्डी येथील श्रमशक्‍ती भवन येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये अ, फ व ज झोनचे सुमारे 290 स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिका आधारकार्डशी लिंक केल्याशिवाय धान्याचे वाटप करू नये, अशा सूचना अन्‍नधान्य वितरण अधिकार्‍यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या आहेत; तसेच यापुढे धान्याचे वाटप ई-पॉस मशिनद्वारेच करावे, अशीही सूचना या वेळी अधिकार्‍यांनी केली आहे. या कार्यक्रमात पुणे येथील अन्‍नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना मार्गदर्शन केले.

या वेळी शिधापत्रिका कार्यालयाचे परिमंडल अधिकारी एन. टी. भोसले, दिनेश तावरे आदींसह पुरवठा निरीक्षक व तिन्ही झोनच्या शिधापत्रिका कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
धान्य वाटपामध्ये पारदर्शीपणा आणण्याठी र शासनाने ई-पॉस मशिनद्वारे धान्याचे वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शहरातील प्रत्येक धान्य दुकानदाराला या मशिनचे वाटप करण्यात आले आहे. मध्यंतरी या मशिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने त्या पुन्हा राज्य शासनाने मागितल्या होत्या. त्यामध्ये दुरुस्ती करून अद्ययावत मशिन पुन्हा धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. या मशिनद्वारे ज्याच्या नावावर शिधापत्रिका आहे त्यालाच धान्य मिळणार आहे.

यासह एका शिधापत्रिकेवर किती धान्य मिळणार आहे, याबाबत त्या मशिनमध्ये माहिती समाविष्ट केली आहे. त्यामुळे धान्य वाटपामध्ये होणार्‍या भ्रष्टाचाराला खो बसणार आहे. या मशिनची माहिती देण्यासाठी आकुर्डीत कार्यशाळा घेण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासून, रहिवास पुरावा म्हणून देखील शिधापत्रिकेचा वापर केला जातो. यामुळे गेल्या काही वर्षांत बोगस शिधापत्रिका काढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्य शासनाच्या वतीने गेल्या दोन-तीन वर्षांत बोगस शिधापत्रिका शोधण्यासाठी अनेक मोहिमा घेण्यात आल्या. या मोहिमेत लाखो बोगस शिधापत्रिका रद्द देखील करण्यात आल्या; परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा  बोगस शिधापत्रिका निर्माण झाल्या  असण्याची शक्यता आहे.