Thu, Apr 25, 2019 21:46होमपेज › Pune › आकुर्डी, प्राधिकरणात विस्कळीत पाणीपुरवठा

आकुर्डी, प्राधिकरणात विस्कळीत पाणीपुरवठा

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 12:31AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

आकुर्डी, निगडी, प्राधिकरण परिसरात गेल्या अनेक आठवड्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.  पाणी नियमित आणि पुरेशा प्रमाणात येत नसल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. या भागांतील पाणीपुरवठा येत्या आठवडाभरात सुरळीत करावा; अन्यथा ‘अ’ श्रेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्थायी समितीचे सदस्य  राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ, वैशाली काळभोर व शिवसेनेचे अमित गावडे यांनी प्रशासनाला दिला आहे. 

स्थायी समितीच्या गुरुवारी (दि.7) झालेल्या सभेत आकुर्डी, निगडी व प्राधिकरणातील अनियमित पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. त्यानंतर नगरसेवकांनी त्याबाबत माहिती दिली. मिसाळ म्हणाले की, निगडी, प्राधिकरणातील पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळित झाला आहे. पाणी येण्याची वेळ देखील निश्चित नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. प्राधिकरणात केवळ 20 एमएलडी पाणी येत असून, हे पाणी पुरेसे नाही. प्राधिकरणात समान पाणीपुरवठा होत नाही. पवना धरण 100 टक्के भरले असल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे, तरीही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. हिवाळ्यात पुरेसे पाणी मिळत नाही, तर उन्हाळ्यात काय परिस्थिती येईल, असा सवाल प्रभागातील नागरिक विचारत आहेत. 

नगरसेवक गावडे म्हणाले की, प्राधिकरणाच्या विविध भागांत सकाळी आणि संध्याकाळी देखील पाणी येत नाही; तसेच विविध भागांत पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत पाणीपुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यास दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो; मात्र त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती होते. नगरसेविका काळभोर म्हणाल्या की, प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी आणि आकुर्डी गावठाण प्रभागात गेल्या अनेक आठवड्यांपासून पाण्याची मोठी समस्या आहे. प्राधिकरण व आकुर्डी परिसराला एकाच टाकीतून पाणीपुरवठा केला जात असल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही.