होमपेज › Pune › आकुर्डीतील सेना भवन होतेय पक्षाच्या कामाचा केंद्रबिंदू 

आकुर्डीतील सेना भवन होतेय पक्षाच्या कामाचा केंद्रबिंदू 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

छत्रपती शिवाजी महाराज युद्धाची योजना गडावर आखायचे, त्याचप्रमाणे शिवसेना भवन आपला गड आहे.  हे कार्यालय आपल्या कामाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या आवाहनाला शहर शिवसेनेने  प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.  सेनेच्या महत्त्वाच्या बैठका आता आकुर्डीतील शिवसेना भवन येथे होऊ लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर शहरातील सेनेचे एकमेव आमदार गौतम चाबुकस्वार हे दर गुरुवारी शिवसेना भवनमध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत

शहरात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील (शिरूर), श्रीरंग बारणे (मावळ) असे दोन खासदार व गौतम चाबुकस्वार (पिंपरी) यांच्या रूपाने एक आमदारही आहे.   मात्र मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत युतीच्या आशेवर गाफील असलेल्या सेनेची युती तुटल्याने ऐनवेळी धावपळ झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत घातलेले लक्ष, राष्ट्रवादीतील दिग्गजांचा भाजपात झालेला प्रवेश याचा परिणाम म्हणून  भाजपने 128 पैकी 77 जागा जिंकून महानगरपालिकेत सत्ता संपादन केली. शिवसेनेला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावे लागले.  

शिवसेनेतील गटबाजी तसेच संपर्कप्रमुख, खासदार, आमदार व स्थानिक पदाधिकारी यांच्यात परस्पर समन्वयाचा असलेला अभाव या बाबींमुळेही शिवसेनेच्या अपयशास हातभार लागला. मात्र आता लोकसभा व विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने शिवसेनेने झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी व संघटनात्मक बांधणीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनाप्रमुखांचा सहवास लाभलेले शिवसेना नेते खा.  राऊत यांच्याकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागीय संपर्क नेते म्हणून जबाबदारी सोपवली आहे.  राऊत यांनी पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  त्यांनी नुकतीच आकुर्डी येथील शिवसेना भवनला भेट दिली.  त्यावेळी  खा.  राऊत यांनी संघटनेच्या स्थानिक नेतृत्वास  व शिवसैनिकांना काही टिप्स,मंत्रही देऊन टाकले होते. 

आगामी निवडणुकीत शिवशाहीचा सेतू बांधण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे. पिंपरी- चिंचवड, भोसरीतून शिळा आणल्या पाहिजेत, त्यासाठी शिवसेना कार्यालय गजबजायला हवे. पक्षाची बांधणी, आखणी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातूनच व्हावी. छत्रपती शिवाजी महाराज युद्धाची योजना गडावर आखायचे त्याच प्रकारे शिवसेना भवन आपला गड आहे. हे कार्यालय आपल्या कामाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. या कार्यालयाद्वारे आपल्या राजकीय हालचाली वाढल्या पाहिजेत असे आवाहन राऊत यांनी केले होते 

शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी खा.  राऊत यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.  पक्षाच्या महत्वाच्या बैठका आकुर्डी शिवसेना भवन येथे होऊ लागल्या आहेत.  शिवसेनेच्य शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांच्या नियुक्तीनंतर आता शहर कार्यकारिणी, विधानसभा प्रमुख, उपप्रमुख, समनवयक, विभागप्रमुख यांच्या नियुक्त्या  होणार आहेत.  त्यासाठी चर्चा करण्यासाठी पिंपरी संपर्कप्रमुख गिरीश सावंत,खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, आदींच्या उपस्थितीत आकुर्डी शिवसेना भवन येथेच बैठक झाली.  

एवढेच नव्हे तर पिंपरी- चिंचवड मधील शिवसेनेचे एकमेव आमदार गौतम चाबुकस्वार हे आता अधिवेशन संपल्यानंतरच्या गुरुवारपासून दर गुरुवारी शहरातील विशेषतः पिंपरी मतदार संघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.  स्थानिक नेत्यांचा हा उत्साह कुठवर टिकून राहतो,  याबाबत कुतूहल असले तरी सध्या मात्र शिवसेना भवन सेनेच्या कामाचा केंद्रबिंदू बनले आहे एवढे मात्र खरे.


  •