Sat, Jul 20, 2019 15:31होमपेज › Pune › ‘आक्या’ माझा ‘गेम’ करणार होता म्हणून ...

‘आक्या’ माझा ‘गेम’ करणार होता म्हणून ...

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 05 2018 2:03AMपिंपरी : संतोष शिंदे

आक्याचे शहरातील प्रस्थ झपाट्याने वाढू लागले होते... त्याच्या ‘गँग’मध्ये सामील होणार्‍या गुन्हेगारांची संख्या वाढत होती. मी आक्याच्या ‘हिटलिस्ट’वर होतो. त्यामुळे ‘आक्या’ जिवंत असणे माझ्यासाठी घातक होते. ‘आक्या’ माझी विकेट टाकणार असल्याची पक्की खबर मला लागली असल्याने मग मीच त्याचा ‘गेम’ वाजवला.. अशी धक्कादायक कबुली आकाश लांडगे खून प्रकरणातील मुख्य आरोपी ‘रंज्या’ ऊर्फ रणजित चव्हाणने पोलिसांना तपासात दिल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. 

29 मे 2018 रोजी चिंचवड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चापेकर चौकामध्ये आकाश तानाजी लांडगे (24, पागेची तालीम, चिंचवडगाव)  या तरुणाचा वर्चस्ववादातून निर्घृण खून करण्यात आला होता. आकाशच्या खूनप्रकरणी त्यावेळी रणजित चव्हाण, स्वप्निल ऊर्फ बाबा मोरे, प्रफुल्ल ढाकणे, सोन्या वराडे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर मुख्य आरोपी  रंज्या चव्हाण तीन महिन्यांपासून फरार होता. चिंचवड पोलिसांनी त्याला भूम येथून नुकतीच सापळा रचून रंजकरित्या अटक केली. 

पोलिस चौकशीत त्याने केवळ भीतीपोटी आकाशचा खून केल्याची कबुली दिली. ‘रंज्या’ त्या रात्री चिंचवड येथील जवळच्या  बागेमध्ये दारू पीत होता. त्यांच्यात आकाशच्या वाढत्या गँगबद्दल चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी रंज्याचा एक ‘शूटर’ आला. त्याने आकाश लांडगे हा बिनहत्याराचा चौकात आला असल्याची खबर दिली. रंज्याने लगेचच आक्याला संपवण्याचा निर्णय घेतला. बेसावध असलेल्या आकाशवर चौघांनी कोयता आणि रॉडने हल्ला केला. पिसाट झालेल्या रंज्याने आकाशवर कोयत्याने एकूण 12 वार केले; तसेच सिमेंटची कुंडी आकाशच्या डोक्यात मारली. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्यावर उपचार सुरू असताना 31 मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास आकाशचा मृत्यू झाला. 

आकाशच्या मृत्यूची बातमी समजताच आकाशच्या मित्रांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आकाशाच्या मृत्यूनंतर काही दिवस चिंचवड परिसरात तणावाचे वातावरण होते. त्यानंतर काही दिवसांनी आकाशच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेला निहाल नाणेकर याचादेखील गोळ्या झाडून खून करण्यात आला. विकी घोलप आणि त्याच्या एका साथीदाराने निहालवर जवळून गोळ्या झाडल्या.