Wed, Jun 26, 2019 12:16होमपेज › Pune › हा सत्तेचा माज म्हणायचा का?; कदम यांच्या वक्तव्यावर अजित पवारांची टीका

हा सत्तेचा माज म्हणायचा का?; कदम यांच्या वक्तव्यावर अजित पवारांची टीका

Published On: Sep 05 2018 1:10PM | Last Updated: Sep 05 2018 1:10PMपुणे : प्रतिनिधी

भाजपाचे आमदार मुलींना पळवून आणण्याची भाषा करत आहेत. हा भाजपाच्या आमदारांना सत्तेचा आलेला माज म्हणायचा का? अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राम कदम यांच्या वक्तव्यावर यांनी केली. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. 

मुलींना काही त्यांचे अधिकार आहेत की नाहीत? मुलांना ज्याप्रमाणे जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे तसाच मुलींना सुद्धा आहे. मुलींना पळवून नेऊ, उचलून घेऊन जाऊ ही कुठली भाषा? फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये यांची असे बोलण्याची हिंमत होतेच कशी? ही घमंडशाही म्हणायची का? असा सवालही अजित पवार यांनी विचारला.

पवार म्हणाले, एखादी चूक झाली तर भारतीय संस्कृतीमध्ये माफी मागण्याची पद्धत आहे. मात्र साधा खेदही व्यक्त केल्याचे दिसले नाही. याचा मी निषेध व्यक्त करतो. हा कसला माज? सत्तेचा की अजून कसला? याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले.

पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षण पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आदी उपस्थित होते.