Tue, Apr 23, 2019 09:33होमपेज › Pune › द्वेषाची गरळ ओकणार्‍यांना गुरुजी कसे म्हणायचे?

द्वेषाची गरळ ओकणार्‍यांना गुरुजी कसे म्हणायचे?

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 29 2018 1:18AMपुणे : प्रतिनिधी

समाजामध्ये ‘गुरुजी’ हे नाव आदराने आणि अचूक मार्गदर्शक म्हणून घेतले जाते. मात्र, या नावाला काळिमा फासण्याचे काम काही लोक सातत्याने करत आहेत. बागेतील आंबे खाल्ल्यावर मुले होतात, असे बोलून स्रियांना कमी लेखत आहेत. संतांपेक्षा मनु श्रेष्ठ आहे, अशी सामाजिक द्वेष निर्माण करणारी गरळ ओकणार्‍यांना मग गुरुजी कसे म्हणायचे, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता भिडे गुरुजींवर टिकास्त्र सोडले. 

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिंतामणी ज्ञानपीठच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुजन गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अजित पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार, शास्त्रीय नृत्य गुरू सुचेता भिडे - चापेकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला सांकला यांचा सन्मान करण्यात आला, या वेळी अजित पवार बोलत होते. याप्रसंगी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी आमदार बापू पठारे, माजी महापौर अंकुश काकडे, बापूसाहेब पठारे, रुपाली चाकणकर, भाऊसाहेब भोईर, रवींद्र माळवदकर, भगवान साळुंके, राकेश कामठे, मनाली भिलारे आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या देशात महिला सक्षमीकरणासाठी चळवळ उभारली, ती अविरत सुरू आहे. शरद पवार यांनी सैन्य दलात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, निवडणुकीत महिलांसाठी 33 टक्‍के आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण, महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांची संकल्पना आणली आणि राबविली. परंतु, सावित्रीबाईंनी ज्या भिडे वाड्यातून स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली, त्या भिडे नावाशी साधर्म्य असलेले लोक माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुले होतात. फक्त मुलेच होतात मुली का होत नाहीत? स्रियांना कमी लेखण्याचा हा डाव आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

अप्पा रेणुसे, दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, अभय मांढरे, हर्षवर्धन मानकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.अप्पा रेणुसे यांनी स्वागत आणि गौरवार्थी गुरुजनांचा परिचय करून दिला.  विशाल तांबे यांनी आभार मानले. 

साप कोण सोडणार होते; एकदा नावे जाहीर कराच

आषाढी वारी दरम्यान कोण पंढरपूरमध्ये साप सोडणार होते, हे समाजाच्या समोर यायला हवे. राज्याच्या महसुल मंत्र्यांनी बोलण्यापेक्षा आणि आरोप करण्यापेक्षा त्यांच्याकडे असलेले रेकॉर्डींग जाहीर करावे. एकदाच ‘दुध का दुध आणि पानी का पानी’ होऊन जाऊ दे, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात 58 मोर्चे शांततेत काढण्यात आले. यानंतरही सरकारची संवेदना जागी झाली नाही. उलट वेगवेगळी वक्तव्ये करून जखमेवर मीठ चोळण्याचा, डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. वारीत साप सोडण्याचे वक्तव्य कोणी केले असेल, तर ते समाजापुढे आले पाहिजे, असे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.