Thu, May 23, 2019 04:28होमपेज › Pune › विमान प्रवासी वाढले, एसटी, रेल्वेचे घटले

विमान प्रवासी वाढले, एसटी, रेल्वेचे घटले

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 12:57AMपुणे: प्रतिनिधी

पुण्यातून विमानाने प्रवास करणार्‍र्‍या प्रवाशांची संख्या यावर्षी पुन्हा काही लाखांनी वाढली असल्याचे तर दुसरीकडे एसटी आणि रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत आणखी घट झाली आहे. महापालिकेच्या 2017-18 या वर्षांच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून ही बाब समोर आली आहे. 

शहरातील वाहनांची वाढती संख्या, त्याचबरोबर विमान, रेल्वे आणि एसटी यांच्या वर्षभरातील प्रवासी संख्येची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात गेल्या पाच वर्षात पुण्यातून विमानाने प्रवास करणार्‍यांची संख्या वाढत चालली असल्याचे समोर आले आहे. यामध्ये 2017-18 या वर्षात पुण्यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर  तब्बल 71 लाख 99 हजार 855 जणांनी विमान प्रवास केला आहे.  

यात  दररोज प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या 22 हजार 466 इतकी आहे. विशेष म्हणजे गत वर्षांच्या तुलनेत विमानाने प्रवास करणार्‍यांच्या संख्येत 6 लाख 87 हजारांची वाढ झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे  रेल्वे आणि एसटी बसने प्रवास करणार्‍यांची संख्या मात्र घटत चालली असल्याचे समोर आले आहे.  पुणे विभागातून 2017-18 या एका वर्षांत 7 कोटी 77 लाख 23 हजार लोकांनी रेल्वेने प्रवास केला.

हीच संख्या सन 2016-17 मध्ये 7 कोटी 95 लाख 36 हजार इतकी होती. तर एस.टीच्या प्रवाशांची 2017-18 मध्ये पुणे विभागातील प्रवाशांची संख्या 10 कोटी 68 लाख 58 हजार इतकी आहे. दिवसाला 2 लाख 93 हजार लोक एस.टीने प्रवास करतात. गतवर्षी म्हणजेच 2016-17 च्या तुलनेत प्रति दिन तब्बल 11 हजारांनी एस.टीच्या प्रवाशी संख्येत घट झाली आहे.