Thu, Jul 18, 2019 02:53होमपेज › Pune › ‘एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टिम’ युनिट गायब

‘एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टिम’ युनिट गायब

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 12:30AMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी होणारे वायू प्रदूषण नियंत्रित करून ते स्वच्छ करून शुद्ध हवा वातावरणात सोडणारे ‘एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टिम’ युनिट (यंत्र) गायब झाले आहे. सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करीत पिंपरी चौकात हे युनिट बसविले होते; मात्र, पहिलाच प्रयोग फसल्याचे या घटनेवरून उघड होत आहे.   

शहरातील चौक, बाजारपेठ, बस स्थानक, शाळा व महाविद्यालय, रूग्णालय अशा वर्दळीच्या ठिकाणी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. वातावरणातील दूषित हवा शोषून घेऊन स्वच्छ व शुद्ध हवा वातावरणात सोडण्याचे काम ‘एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टीम’द्वारे केले जाते. हे युनिट प्रॉडक्ट डिजाईन व टोमेशन सेंटर या खासगी एजन्सीच्या मार्फत शहरातील सुमारे 200 ठिकाणी लावण्याचे नियोजन आहे. या युनिटचा देखभाल, दुरूस्ती व सुरक्षेचा खर्च संबंधित एजन्सी करणार आहे. त्यासाठी पालिकेला केवळ जागा देऊन वीजपुरवठा करण्याची जबाबदारी आहे.  

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात प्रायोजिक तत्वावर पहिले युनिट  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्त साधून 5 जून 2017 ला बसविण्यात आले व  अनावरण भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले होते. वर्षभरातच ते युनिटच चौकातून गायब झाले आहे. तर, वर्षभराच्या कालावधीत 200 पैकी केवळ 35 ते 40 युनिटच शहरात लावली गेली आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन या संदर्भात किती उत्साही आहे, हे स्पष्ट होत आहे. सदर उपक्रम गुंडाळण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. परिणामी, पर्यावरप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. 

अशी आहे कार्यपद्धती

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत वायू प्रदूषणाची पातळी उच्च आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनासह विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. हे वायू प्रदूषण रोखून वातावरणात शुद्ध हवा सोडण्याचे काम हे युनिट करते. एका युनिटद्वारे 60 ते 60 फूट परिघातील 2 हजार क्युबिक फूट दूषित हवा एका मिनिटाला खेचून ती शुद्ध करून पुन्हा हवेत सोडली जाते. वाहतूक वर्दळ अधिक असलेल्या सकाळी 8 ते रात्री 11 या वेळेत युनिटचे कार्य चालते. युनिटवर लावलेल्या जाहिरातीद्वारे मिळणार्‍या उत्पन्नातून युनिटची देखभाल व दुरुस्तीचा खर्च खासगी एजन्सी करते. 

मेट्रोच्या कामामुळे यंत्र काढून टाकले

पुणे मेट्रोचे काम खराळवाडीपासून पुढे मोरवाडीकडे सेवा रस्त्यावर सुरू झाले आहे. त्यांच्या कामामुळे ‘एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टिम’ यंत्र काढून टाकले आहे. मेट्रोचे काम झाल्यानंतर पुन्हा ते युनिट बसविण्यात येणार आहे. शहरात आतापर्यंत विविध ठिकाणी एकूण 35 युनिट बसविण्यात आली आहेत. जागा व वीजपुरवठा उपलब्ध होताच, तेथे युनिट  बसविण्यात येत आहेत. या यंत्रामुळे शहरातील दूषित वायू स्वच्छ होण्यास मदत मिळत आहे, असे पालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.