Tue, Apr 23, 2019 13:35होमपेज › Pune › पहिल्याच दिवशी नवे आयुक्‍तबरसले

पहिल्याच दिवशी नवे आयुक्‍तबरसले

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:38AMपुणे : प्रतिनिधी

महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी सौरभ राव यांनी स्थायी समितीच्या बैठकीत अधिकार्‍यांना कडक शब्दात सुनावले. पालिका इमारतीमधील कार्यालयांची पाहणी करताना त्यामधील स्वच्छता आणि फायलींचे ढिगारे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि कार्यालयीन स्वच्छता व झीरो पेंडेन्सी राबविण्याचे आदेश दिले. 

सौरभ राव यांनी मंगळवारी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी थेट स्थायी समितीच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी जलतरण तलावांच्या ‘सेफ्टी ऑडिट’च्या विषयावर चर्चा सुरू होती. गत आठवड्यात तळजाई जलतरण तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यावर तलावांचा सेफ्टी ऑडिटचा अहवाल सादर करण्याची मागणी सदस्यांनी गत आठवड्यात केली होती, मात्र, प्रशासनाकडून हा अहवाल सादर करण्यात आला नाही, त्यावरून आयुक्त राव यांनी हा अहवाल का मांडण्यात आला नाही, अशी विचारणा केली. त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी संबंधित अधिकार्‍याला कडक शब्दात सुनावले.  एवढ्यावर न थांबता त्यांनी थेट कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेशही दिले.

समितीच्या बैठकीनंतर राव यांनी महापालिका भवनाच्या इमारतींमधील कार्यालयांत फेरफटका मारला. अनेक कार्यालयांमध्ये त्यांना फाईल्सचे साठलेले ढिगारे, जुन्या रेकॉर्डच्या फाईल्स, फर्निचर असे साहित्य आढळून आले.  त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यालय स्वच्छ नसेल, तर नागरिकांना येथे यावेसे वाटणार नाही. पालिकेत आल्यानंतर नागरिकांना छान वाटले पहिजे, यासाठी कार्यालयीन स्वच्छता आणि झिरो पेंडसी तत्काळ राबविण्याच्या सूचना दिल्या.

शहराच्या दृष्टीने सर्वच प्रश्‍नांचा प्राधान्य

शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सर्वच प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य राहणार असल्याचे राव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले, शहराच्या प्रश्‍नांची मला चांगलीच माहिती आहे. प्रामुख्याने कचरा, पाणी गळती, वाहतूक व्यवस्था, पीएमपी असे महत्त्वाची आव्हाने आहेत. ते सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. याशिवाय समान पाणीपुरवठा, नदी सुधारणा, चांदणी चौक, भामा आसखेड, पार्किग पॉलिसी यांसाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उरुळी व फुरसुंगी ग्रामस्थांशी चर्चा

2014 मध्ये जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो तेव्हा पुण्यात कचरा प्रश्‍न पेटला होता. आता आयुक्तपदी आल्यानंतर कचरा प्रश्‍न समोर आलेला आहे. उरुळी देवाची व फुरसुंगी ग्रामस्थांची चर्चा केली आहे, त्यांच्या आश्‍वासनांची पूर्तता न झाल्यास त्यांनी कचरा डेपो 20 एप्रिलपासून बंदचा इशारा दिला आहे. मात्र, ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करून हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे राव यांनी स्पष्ट केले.

Tags : Pune ,Aggressive, very, first, day,  new, commissioner