Wed, Jul 24, 2019 12:38होमपेज › Pune › ‘आरटीओ’त संघटनांचे पदाधिकारी ‘एजंट’

‘आरटीओ’त संघटनांचे पदाधिकारी ‘एजंट’

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 1:07AM

बुकमार्क करा
पुणे : नवनाथ शिंदे

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीआ) एजंटगिरीला लगाम घालण्याची मागणी करणार्‍या विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनीच चक्क एजंटपणाची दुकानदारी  सुरु केली आहे. विविध संघटनेच्या लेटरहेडवर रिक्षाचालकांसह नागरिकांना वाहन परवाना, परमिट, फिटनेस, आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी अट्टाहास केला जात आहे. संघटनेच्या हितासाठी आणि नागरिकांच्या मदतीसाठी सर्व कामे केली जात असल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात मात्र, आरटीओतील कागदपत्रांचे काम झाल्याबरोबर संघटनेच्या नावाखाली वाहनचालकांकडून हजारो रुपये उकळले जात आहे. त्यामुळे संघटनेच्या कामाला महत्त्व देणार्‍या आरटीओ अधिकार्‍यांकडून पदाधिकार्‍यांची दुकानदारी बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांना विनाएजंट वाहन परवाना, रिक्षाचालकांना ऑनलाईन परमिट, वाहनांची विविध कागदपत्रे देण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून  सक्षमरित्या ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे एजंटगिरीला मोठ्या प्रमाणात लगाम बसला आहे. दुसरीकडे मात्र ऑनलाईन सेवेचा शुभारंभ झाल्यामुळे दुकानदारी करणार्‍या काही संघटनेचा गल्ला बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे काही कारणास्तव कार्यालयातील संगणक प्रणाली अथवा इंटरनेट सेवेत तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ काही संघटनांकडून उठसूट आंदोलन केले जात आहे. विशेषतः शासनाच्यावतीने रिक्षाचालकांना खुले परमिट करण्याच्या निर्णयामुळे अनेक संघटनांच्या अध्यक्ष आणि सचिवांनी खिसे भरले आहेत. ऑनलाईन परमिट देण्यासाठी आणि विनाएजंट काम करण्यासाठी आरटीाओच्यावतीने ऑनलाईन यंत्रणेस प्राधान्य देण्यात आले. मात्र, कागदपत्रांची माहिती नसणार्‍या रिक्षाचालकांकडून संघटनेच्या अध्यक्षांसह सचिवांनी परमिट मिळवून देण्यासाठी दोन ते पाच हजार रुपये घेतल्याची माहिती रिक्षाचालकांनी दिली आहे. त्यामुळे संघटनेच्या नावाखाली दुकानदारी चालविणार्‍या काही पदाधिकार्‍यांकडून आरटीओ कार्यालयच माल गोळा करण्याचे ठिकाण बनले असल्याची चर्चा आहे.

आरटीओ कार्यालयात काही संघटनेचे पदाधिकारी किरकोळ कामांसाठी दररोज प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांच्या केबीनमध्ये वारंवार चकरा मारताना आढळून येत आहेत. तर संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून आरटीओतील काही कर्मचार्‍यांना हाताशी धरुन काम केले जात आहे. काही पदाधिकार्‍यांकडून विविध कागदपत्रांची अपुर्तता असल्यास कर्मचार्‍यांना  चिरीमिरी देऊन ते काम पुर्ण केले जाते. तर संबधित रिक्षाचालकांकडून त्या कामासाठी दुपटीने पैसे वसूल केले जात आहेत. जर कर्मचार्‍याने कागदपत्रे नसल्यामुळे काम करण्यास नकार दिल्यास संघटनेच्या लेटरहेडवर धमकीवजा काम करण्याची मागणी आरटीओकडे करण्यात येत आहे. त्यामुळे आरटीओ अधिकार्‍याकडून अशा भंपक पदाधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.