Tue, Apr 23, 2019 01:39होमपेज › Pune › स्वारगेट बसस्थानकात एजंटांचा सुळसुळाट

स्वारगेट बसस्थानकात एजंटांचा सुळसुळाट

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 12:11AMपुणे : प्रतिनिधी 

‘कोल्हापूर, सोलापूर, सांगली...’, ‘एसटीपेक्षा लवकर पोहोचवू तेही एसी गाडीतून’, अशा आरोळ्या ठोकत उभे असलेले एजंट अगदी विनावाहक बसेसच्या बुकिंग केबिनजवळ सर्रासपणे पाहायला मिळतात. हे चित्र पुण्यातील कुठल्याही रस्त्यावरील नसून चक्क स्वारगेट एसटी बसस्थानकातील आहे. राज्यातील सर्वाधिक मोठी प्रवासी संख्या असलेल्या स्वारगेट एसटी स्थानकात खासगी एजंटांच्या सुळसुळाटाने प्रवाशांची डोकेदुखी वाढत आहे. एसटी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी चर्चा आहे.   

दरम्यान, एका गृहस्थाला खासगी कारने नवी मुंबईतील खारघर येथे सोडतो, असे सांगून चौघांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार नुकताच घडला. स्वारगेट एसटी स्थानकात हा तरुण एसटीची वाट पाहत असताना एका व्यक्तीची प्रवासी कारमध्ये जागा शिल्लक आहे, असे सांगितले. गाडीत बसल्यानंतर तळेगावजवळ कार थांबली आणि त्या तरुणाकडील चेन, रोख रक्कम, एटीएम कार्ड चोरून लुटारू पसार झाले. यामुळेच शहरातील स्वारगेट एसटी स्थानक किती सुरक्षित आहे, याबाबत ‘दै. पुढारी’ने पाहणी केली असता ते सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आले.  खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या कंपन्यांचे एजंट बेकायदेशीरपणे स्थानकात घुसून प्रवाशांच्या मागे लागत असल्याचे दिसून येते. तरीही एसटी विभाग, पोलिस केवळ पाहण्यापलीकडे काहीही करत नाहीत. प्रवाशाने येण्यास नकार दिल्यास त्याच्यावर हात उगारण्यापर्यंत एजंटांची मग्रुरी वाढल्याचेही दिसते. बसची वाट पाहणार्‍या प्रवाशांना स्वस्त भाड्याचे आमिष दाखवून त्यांना खासगी वाहनांकडे नेण्याचा उद्योग एजंट करत आहेत. दरम्यान, एसटीची वाट पाहत बसण्यापेक्षा जलदगतीने इच्छितस्थळी पोहोचू, अशा मानसिकतेमुळेच एजंटांचे फावते आहे.   

कारवाई करण्याचा अधिकार यांना एसटी स्थानक परिसराच्या 200 मीटर अंतराच्या आत जर कोणी प्रवासी वाहतूक करण्यासाठी खासगी वाहनात प्रवासी भरण्यास बंदी आहे. असे होत असेल तर एसटी प्रशासन व वाहतूक पोलिस, आरटीओकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, सध्या लहान कार, जीप आदी वाहने अगदी बसस्थानकाजवळ पार्क करून काही खासगी वाहतूक करणारे प्रवाशांना आकर्षित करीत आहेत. अशा वाहनांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना लुटणार्‍यांच्या टोळ्या सक्रिय आहेत. त्यामुळे एजंटांसह अशा वाहनचालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

एसटीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दालनापर्यंत दलालांची ऊठबस होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नाही, अशी सध्या चर्चा आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढवून उत्पन्नाचे ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट स्वारगेट स्थानक प्रशासनाकडून दुर्लक्षितच राहत असल्याचे दिसून येत आहे. अशा एजंटांवर एसटी प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असे देखील सूत्रांनी सांगितले.

प्रवाशांनी काय करावे?

अनोळखी व्यक्तीबरोबर जाऊ नये.

एजंटांच्या आमिषाला बळी पडून खासगी वाहनाने जाऊ नये.

एसटीमध्ये बिघाड झाल्यास अन्य बस उपलब्ध होते.

खासगी वाहनचालक मात्र प्रवाशांना वार्‍यावर सोडतात.

अपघात झाल्यास एसटीकडून संबंधित प्रवाशाला किंवा कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळतो.

पोलिसांसमोरही निर्धास्तपणे चालते एजंटगिरी

स्वारगेट बसस्थानकात अगदी पोलिसांसमोरही एजंटगिरी निर्धास्तपणे सुरू असल्याचे चित्र आहे. पोलिसांकडून संशयितरीत्या बसस्थानक परिसरात फिरणार्‍या अशा एजंटांवर महिन्यातून आठ ते दहा कारवाया करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. वास्तविक  फसवणूक झाल्याचा किंवा इतर प्रकारे प्रवाशांना त्रास दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतरच पोलिसांकडून कारवाई केली जाते. अन्यथा एसटी प्रशासनाकडून तक्रार आल्याशिवाय कारवाई केली जात नाही.